दापोली : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने सध्या राज्यभरात विविध पदांवर नियुक्त्या करण्यात येत आहेत.

याच पार्श्वभूमीवर सचिन गायकवाड यांची रत्नागिरी जिल्हासचिवपदी फेरनियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीनंतर दापोली तालुक्यातील मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांना पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.

सचिन गायकवाड यांनी यापूर्वीही रत्नागिरी जिल्ह्यात मनसेच्या संघटनात्मक वाढीसाठी तसेच पक्षाची विचारधारा तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या या दांडग्या अनुभवाचा आणि धडाडीच्या कार्यपद्धतीचा पक्षाला आगामी काळात निश्चितच मोठा फायदा होईल, असा सार्थ विश्वास स्थानिक कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे.

आता या नव्या जबाबदारीच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यात पक्षाची संघटना अधिक सक्षम करणे, नव्या कार्यकर्त्यांना पक्षाशी जोडणे, युवकांना संघटनेत सक्रिय करणे आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी प्रभावीपणे आवाज उठविणे, अशी महत्त्वाची आव्हाने गायकवाड यांच्यासमोर असणार आहेत.