गुहागर : तालुक्यातील शृंगारतळी येथे नुकत्याच झालेल्या हल्ल्याच्या घटनेचा रत्नागिरी जिल्हा रोहिदास समाजसेवा संघाच्या वतीने तीव्र शब्दांत निषेध नोंदवण्यात आला आहे.
या प्रकरणातील हल्लेखोरांना तातडीने अटक करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
या गंभीर घटनेच्या अनुषंगाने संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश खेडेकर, कार्याध्यक्ष विजय खेडेकर, गणेश सरणकर आणि इतर सर्व पदाधिकाऱ्यांनी रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांची प्रत्यक्ष भेट घेतली.
या भेटीदरम्यान शृंगारतळी येथे घडलेल्या हल्ल्याबाबत पोलीस अधीक्षकांसोबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या घटनेची पोलिसांनी अत्यंत गांभीर्याने दखल घ्यावी, जेणेकरून समाजामध्ये भीतीचे किंवा दहशतीचे वातावरण निर्माण होणार नाही.
तसेच भविष्यात अशा हिंसक घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी दोषींवर तात्काळ कडक कारवाई करावी, अशी स्पष्ट भूमिका संघाच्या पदाधिकाऱ्यांनी या बैठकीत मांडली.

