रत्नागिरी : शाळेच्या वेळेत अध्यापनाचे काम सोडून विनाकारण पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद कार्यालयात फिरणाऱ्या शिक्षकांवर आता थेट शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे. शाळेच्या वेळेत शासकीय कार्यालयांचे खेटे घालणारे शिक्षक, मुख्याध्यापक आणि केंद्रप्रमुख आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा निर्णय रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत घेण्यात आला.
जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता केंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत याबाबतचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.
दुपारच्या वेळेत अनेक शिक्षक व मुख्याध्यापक जिल्हा परिषद भवनात फिरताना दिसत असल्याच्या तक्रारी पालक आणि ग्रामस्थांकडून वारंवार करण्यात आल्या होत्या. शिक्षक शाळेत उपस्थित नसल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामकाजावर गंभीर परिणाम होत असल्याचे या तक्रारींमध्ये नमूद करण्यात आले होते.
या पार्श्वभूमीवर शाळेच्या वेळेत शिक्षकांनी विनाकारण शासकीय कार्यालयात येऊ नये, अशा स्पष्ट सूचना देण्यात येणार आहेत. कामानिमित्त कार्यालयात येणे आवश्यक असल्यास त्यासाठी अधिकृत परवानगी किंवा संबंधित कामाचे योग्य कारण असणे प्रशासनाकडून अपेक्षित आहे.
या नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास संबंधित शिक्षकांसह मुख्याध्यापक आणि केंद्रप्रमुखांवरही जबाबदारी निश्चित करून कारवाई केली जाईल.
याच बैठकीत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेबाबत आणि आरोग्याबाबतही अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. लहान मुलांच्या आरोग्यावर मोबाईलच्या अतिवापराचा विपरीत परिणाम होत असल्याचे लक्षात घेऊन प्राथमिक स्तरावरील मुलांना ऑनलाइन अभ्यास देऊ नये, असा निर्णय घेण्यात आला आहे.
त्यामुळे आता प्रत्यक्ष वर्गातील अध्यापनालाच प्राधान्य देण्याच्या सूचना शाळांना करण्यात येणार आहेत. मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती आणि पाठांतराची सवय कमी होत असल्याचे निरीक्षण नोंदवत, शाळांमध्ये पूर्वीप्रमाणेच पाठांतरावर पुन्हा एकदा भर दिला जाणार आहे.
शिक्षणाधिकारी स्वतः शाळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांच्या पाठांतराची पाहणी करणार आहेत. या सर्व नव्या निर्णयांमुळे शाळांमधील शिक्षकांची उपस्थिती, अध्यापनाचा दर्जा आणि विद्यार्थ्यांच्या एकूणच शैक्षणिक प्रगतीवर अधिक लक्ष केंद्रित होईल, अशी अपेक्षा प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे.

