दापोली : शहरातील श्री गोपाळकृष्ण ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादितमध्ये सन २०१८-१९ ते २०२२-२३ या कालावधीत २ कोटी ६९ लाख ५० हजार रुपयांच्या चुकीच्या कर्ज वाटप प्रकरणी. तत्कालीन संचालक, व्यवस्थापक आणि कर्ज अधिकाऱ्यांसह १३ जणांवर दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोरोना महामारीच्या काळात आरोग्य विभागात कर्मचारी असल्याचे भासवून खोटे कागदपत्र आणि पगारपत्रके तयार करून तब्बल २६ बोगस कर्जदारांच्या नावे कर्ज उचलण्यात आले होते.

या संपूर्ण प्रकरणाची दखल घेत जिल्हा उपनिबंधकांनी नियुक्त केलेल्या लेखापरीक्षक श्रीया झगडे यांनी केलेल्या परीक्षणानुसार संस्थेच्या संचालक मंडळाने बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्ज प्रस्ताव मंजूर केले हे समोर आले

याप्रकरणी श्रीया झगडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून दापोली पोलिसांनी चौकशीअंती सुधीर सदानंद तलाठी, राकेश प्रकाश कोटिया, प्रसाद सूर्यकांत मेहता, संजय उमेशचंद्र बुटाला, संजय वसंत साबळे, अतुल काळूराम मेहता, रमेश भागोजी गिम्हवणेकर, सुनील पांडुरंग धोपट, शैला प्रभाकर मेहता, सुप्रिया बाळकृष्ण तलाठी, माधवी माधव शेट्ये, भिकू रामचंद्र मोरे आणि हेमंत आत्माराम कळेकर (मयत) यांच्या विरूद्ध भारतीय दंड संहितेतील कलम ४०६, ४०९, ४१७, ४१८, ४६५, ४६८, ४७१, १२०(ब), ३४ तसेच महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० च्या कलम १४६ व १४७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

2019 ते 2023 दरम्यान जेवढे सरकारी ऑडिटर आले होते त्यांनाही ही बोगस कागदपत्रे ओळखता आली नाही इतकी ती हुबेहूब तयार करण्यात आली होती. त्यामुळे झालेला कर्ज व्यवहार चुकीचा आहे हे आमच्या लक्षात आलं नाही, असं एका संचालकानं नाव न छापण्याच्या अटीवर माय कोकणशी बोलताना सांगितले.

दरम्यान, पतसंस्थेच्या विद्यमान संचालक मंडळाने यापूर्वीच कायदेशीर पावले उचलत सहकार न्यायालयात कलम ९१ नुसार दावे दाखल केले असून संबंधितांच्या मालमत्ता जप्तीची प्रक्रिया सुरू केली आहे, अशी‌ माहितीही समोर येत आहे. पण या प्रकरणी संचालकांकडून संबंधित बोगस कर्जदारांवर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला नाहीये.

दरम्यान श्री गोपाळकृष्ण ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेनं आपली अधिकृत भूमिका अद्यापही स्पष्ट केली नाहीये. त्यांची बाजू समजून घेण्यासाठी आम्ही त्यांच्याशी संपर्क केला परंतु वकिलांचा सल्ला घेऊन आम्ही भूमिका जाहीर करू असं सांगण्यात आलं.

सध्या या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक महेश तोरस्कर करत असून, पुढील तपासासाठी हे प्रकरण रत्नागिरी आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात येऊ शकणार आहे.