हर्णै : येथील नॅशनल हायस्कूलचा विद्यार्थी अहमद मुबीन बामणे याने एस.एस.सी. परीक्षेत ८९.२० टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

या उत्तुंग यशाबद्दल १५ ऑगस्टचे औचित्य साधून त्याचा भव्य सत्कार समारंभ पार पडला. दापोली तालुक्यातील दी हर्णै एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी आणि हर्णै ग्रामपंचायत यांच्या वतीने या गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी अहमद याला सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि एक झाड भेट देऊन गौरविण्यात आले. अहमदच्या या यशामुळे नॅशनल हायस्कूल हर्णैच्या शैक्षणिक गुणवत्तेत आणखीन एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मेहनत, जिद्द आणि सातत्याच्या जोरावर शैक्षणिक क्षेत्रात असेच उत्तुंग यश संपादन करण्याचे आवाहन केले.

या घवघवीत यशाबद्दल अहमदचे पालक मुबीन बामणे व शाहीन बामणे, शाळेचे मुख्याध्यापक आसिफ भाटकर, सर्व शिक्षक, संस्थेचे अध्यक्ष असलम खान, सेक्रेटरी मुबीन हरगे, खजिनदार अजिम सारंग, उपाध्यक्ष इर्शाद महालदार, माजिद महाद्वार, साजीद महालदार, स्कूल कमिटी चेअरमन सईद चिकटे, व्हाईस चेअरमन सना काझी तसेच इतर पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी त्याचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

अहमद बामणे याच्या यशाचे सध्या सर्वत्र कौतुक होत असून हर्णैसह आसपासच्या परिसरातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.