रत्नागिरी : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून देशभक्ती आणि राष्ट्रीय एकतेचा संदेश सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने ‘हर घर तिरंगा’ अभियानाअंतर्गत रत्नागिरीत अग्रणी जिल्हा व्यवस्थापक कार्यालयाच्या वतीने एका भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

बँक ऑफ इंडियाच्या आंचलिक कार्यालयापासून या रॅलीची अत्यंत उत्साहात सुरुवात झाली. शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत जयस्तंभ येथे या रॅलीचा यशस्वी समारोप करण्यात आला.

या रॅलीमध्ये जिल्ह्यातील सर्व बँकांचे अधिकारी, कर्मचारी आणि इतर विविध शासकीय विभागांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

हातात तिरंगा फडकवत आणि देशभक्तीपर जयघोष करत सर्व सहभागी कर्मचाऱ्यांनी संपूर्ण शहरात राष्ट्रप्रेमाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण केले.

राष्ट्रप्रेम, एकता आणि देशाप्रती असलेली समर्पणाची भावना प्रत्येकाच्या मनात कायम जागृत ठेवणे हा या रॅलीचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. हा संपूर्ण उपक्रम अत्यंत शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.