खेड : सामाजिक कार्य, कर्तृत्व आणि समाजासाठी दिलेल्या प्रेरणादायी योगदानाची दखल घेत ज्योती रामदास कदम यांना जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या वतीने २०२६ या वर्षाचा ‘आदर्श माता पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे.

संस्थेच्या सामाजिक बांधिलकीचा एक भाग म्हणून दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. त्यांच्या एकूणच कार्याचा आणि कर्तृत्वाचा गौरव म्हणून त्यांनी हा पुरस्कार स्वीकारावा, अशी विनंती करणारे पत्र संस्थेकडून ३ ऑगस्ट रोजी ज्योती रामदास कदम यांना देण्यात आले आहे.

जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स ही संस्था २०१४ पासून शैक्षणिक, सामाजिक आणि बौद्धिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, समाजाभिमुख मूल्यांची जपणूक आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या माध्यमातून सक्षम नागरिक घडविणे, हे संस्थेचे मुख्य ध्येय असल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

सध्या या संस्थेच्या ४० हून अधिक शैक्षणिक शाखांमध्ये १८ हजारांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत असून ८०० हून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. या संस्थेच्या विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांचाच एक भाग म्हणून हा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे.

‘आदर्श माता पुरस्कार २०२६’ चे वितरण ३१ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता पुण्याच्या नऱ्हे येथील मानाजीनगर भागातील सुधाकरराव जाधवर एज्युकेशनल कॅम्पसमध्ये आयोजित करण्यात आले आहे.