दापोली : तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा चंद्रनगर येथील विद्यार्थिनी आरोही महेश मुलुख हिने सातवीच्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत विशेष गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे.

या दैदीप्यमान यशाबद्दल संपूर्ण चंद्रनगर पंचक्रोशीतून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. आरोही ही केवळ अभ्यासातच नव्हे तर कला, क्रीडा आणि संस्कृती अशा विविध क्षेत्रांत अष्टपैलू कामगिरी करत आहे.

तिने यापूर्वी पाचवीत असताना नासा आणि इस्रोच्या स्पर्धा परीक्षेतही चमकदार यश मिळवत इस्रोवारीचा अनुभव घेतला होता. विशेष म्हणजे यंदाच्या नियोजित नासा भेटीसाठीही तिची निवड झाली असून, नासा आणि इस्रो अशा दोन्ही प्रतिष्ठित संस्थांना भेट देणारी ती दापोली तालुक्यातील एकमेव विद्यार्थिनी ठरली आहे.

बौद्धिक क्षमतेसोबतच आरोहीने क्रीडा क्षेत्रातही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत लांब उडी, खो-खो आणि कबड्डी यांसारख्या खेळांमध्ये तिने दापोली तालुक्याचे यशस्वी प्रतिनिधित्व केले आहे.

शिष्यवृत्ती परीक्षेतील या यशापर्यंत पोहोचण्यासाठी तिला वर्गशिक्षक मानसी सावंत, मुख्याध्यापक मनोज वेदक आणि रेखा ढमके यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

आरोहीने मिळवलेल्या या बहुआयामी यशाबद्दल शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनिल मुलुख, सरपंच भाग्यश्री जगदाळे यांच्यासह ग्रामस्थांनी तिचे विशेष अभिनंदन केले आहे.