दापोली : तालुक्यातील पालगड येथे एका जावयानेच आपल्या सासूचे सुमारे आठ लाख ९० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

याप्रकरणी दापोली पोलिसांनी वेगाने तपास करत आरोपी जावयाच्या मुसक्या आवळल्या असून त्याच्याकडून चोरीला गेलेला संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पालगड कातळवाडी येथे राहणाऱ्या शुभांगी विष्णू दळवी यांनी यासंदर्भात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. प्राप्त माहितीनुसार, ११ ऑगस्ट रोजी सकाळी पावणेआठ ते सव्वानऊच्या सुमारास शुभांगी दळवी घराला कुलूप लावून गुरे चरण्यासाठी बाहेर गेल्या होत्या.

या वेळेचा फायदा घेत चोरट्याने घराच्या मागील बाजूच्या किचनच्या स्लायडिंग खिडकीतून आत प्रवेश केला आणि बेडरूममधील बेडवर ठेवलेल्या पिशवीतील दागिन्यांची पर्स चोरून नेली.

या घटनेनंतर शुभांगी दळवी यांनी या चोरीप्रकरणी आपला जावई विजय जयराम नामुगडे याच्यावर संशय व्यक्त केला होता. या तक्रारीच्या आधारे दापोली पोलिसांनी नामुगडे याला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता, त्याने सासूचे दागिने चोरल्याची कबुली दिली व चोरलेले सर्व दागिने पोलिसांच्या स्वाधीन केले.

यानंतर पोलिसांनी विजय नामुगडे याच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३१(३) आणि ३०५ नुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक प्रकाश मोरे करत आहेत.