रत्नागिरी : जिल्ह्यातील दाभोळ खाडी परिसरातील मच्छीमारांच्या विविध समस्या तसेच लोटे औद्योगिक वसाहतीतून सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यामुळे मत्स्यव्यवसायाचे होत असलेले नुकसान टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी दिले आहेत.
दाभोळ खाडी परिसरात लोटे औद्योगिक वसाहतीमधून येणाऱ्या प्रदूषित सांडपाण्यामुळे मासेमारीवर गंभीर परिणाम होत असल्याच्या मुद्द्यावर मंत्रालयात आयोजित केलेल्या एका विशेष बैठकीत ते बोलत होते.
या बैठकीस माजी आमदार सूर्यकांत दळवी, मत्स्यव्यवसाय आयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. दाभोळ खाडी परिसरात गुहागर तालुक्यातील अंजनवेल ते खेड तालुक्यातील कर्जी तसेच चिपळूण तालुक्यातील गोवळकोटपर्यंतचा भाग येतो.

या विस्तृत परिसरात ५२ मच्छीमार गावे असून सुमारे १४,९८८ इतकी मच्छीमारांची लोकसंख्या आहे. औद्योगिक वसाहतीतील रासायनिक कारखान्यांतून निघणारे सांडपाणी दाभोळ खाडीत सोडले जात असल्याने मासे मृत होण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत.
यावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाने आवश्यक ती कार्यवाही करावी आणि मच्छीमारांचे नुकसान होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे नितेश राणे यांनी स्पष्ट केले.
मच्छीमारांचे हित जपणे ही शासनाची प्राथमिकता असून दाभोळ खाडीच्या प्रदूषणामुळे मासेमारी कोणत्याही परिस्थितीत प्रभावित होऊ नये, याबाबत सर्व यंत्रणांनी दक्षता घेणे गरजेचे आहे. जे उद्योग कोणत्याही प्रक्रियेविना दूषित पाणी खाडीत सोडतात त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी.
तसेच सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांमध्ये उद्योगाकडून येणारे पाणी आणि प्रक्रिया केल्यानंतर सोडले जाणारे पाणी या दोन्हींची गुणवत्ता तपासण्याचे निर्देशही राणे यांनी दिले. दरम्यान, दाभोळ खाडीच्या मुखाशी गाळ काढण्याच्या कामाबाबतही या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.
या कामासाठी राज्यस्तरीय सॅनिटरी समितीची मान्यता घेऊन प्रस्ताव सादर करण्यात आला असून केंद्र शासनाकडूनही याला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्यामुळे महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळामार्फत निविदा प्रक्रिया राबवून हे काम प्राधान्याने पूर्ण केले जावे, अशा स्पष्ट सूचना नितेश राणे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

