करंजाणी : येथील सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूलमध्ये ‘नशामुक्त भारत अभियान’ अंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी नुकताच एक विशेष जनजागृती कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या प्रतिनिधी ब्रह्माकुमारी सारिका आणि ब्रह्माकुमारी विद्या उपस्थित होत्या.

यावेळी उपस्थित प्रतिनिधींनी विद्यार्थ्यांना तंबाखू, सिगारेट, मद्यपान व इतर अमली पदार्थांच्या व्यसनामुळे होणारे गंभीर दुष्परिणाम सविस्तरपणे समजावून सांगितले. तसेच निरोगी जीवनशैली, सकारात्मक विचार, आत्मसंयम आणि चांगले संस्कार यांचे मानवी जीवनातील महत्त्वही अधोरेखित करण्यात आले.

विद्यार्थ्यांना स्वतः व्यसनांपासून दूर राहून आपल्या कुटुंबीयांमध्ये व समाजात याविषयी जनजागृती करण्याचे आवाहन करण्यात आले. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत ‘से नो टू ड्रग्ज, येस टू लाईफ’ असा संदेश देत व्यसनमुक्त भारत घडविण्याची शपथ घेतली.

या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यदायी जीवनशैलीबाबत मोठी जागरूकता निर्माण झाली आहे. संस्थेचे चेअरमन सुजय मेहता आणि मुख्याध्यापिका रितू मेहता यांनी अशा उपक्रमांचे महत्त्व सांगत विद्यार्थ्यांना कायम व्यसनांपासून दूर राहण्याचा संदेश दिला.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील शिक्षक आणि प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या प्रतिनिधींनी विशेष परिश्रम घेतले.