चिपळूण: महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा दौरा होऊन आठवडाही उलटला नाही, तोच प्रशासनातील काही अधिकारी आणि कर्मचारी किती निगरगट्ट बनले आहेत, याचे ज्वलंत उदाहरण चिपळूण तालुक्यात समोर आले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथील मंडळ अधिकारी अनिल दिलीप जाधव याला पाच हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे.

जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर फेरफार नोंदीला मंजुरी देण्यासाठी त्याने या लाचेची मागणी केली होती. याप्रकरणी ४८ वर्षीय निवृत्त मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याने ३ ऑगस्ट २०२६ रोजी एसीबीकडे तक्रार दाखल केली होती.

तक्रारदाराने आपल्या पत्नीच्या नावे सावर्डे येथे खाते क्रमांक ८९४ गट नं. १३४७/३ मधील २१८ चौरस मीटर जागा खरेदी केली होती. या जागेच्या सातबारा उताऱ्यावर तलाठ्यांनी केलेली फेरफार नोंद मंजूर करण्यासाठी मंडळ अधिकारी अनिल जाधव याने पाच हजार रुपयांची मागणी केली होती.

या तक्रारीची दखल घेत एसीबीने ५ ऑगस्ट २०२६ रोजी पडताळणी केली असता जाधव याने लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्याच दिवशी सावर्डे येथील मंडळ अधिकारी कार्यालयात सापळा रचण्यात आला.

ठरल्याप्रमाणे तक्रारदार जाधव याला भेटण्यासाठी गेला असता जाधव याने पाच हजार रुपयांची लाचेची रक्कम त्याच्या जवळील नोटबुकमध्ये ठेवण्यास सांगितली.

पंचांसमक्ष ही रक्कम स्वीकारताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुपारी ३.१० वाजता अनिल जाधव याला रंगेहाथ पकडून ताब्यात घेतले.

याप्रकरणी सावर्डे पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ (सुधारणा २०१८) च्या कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

ही धडक कारवाई ठाणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील आणि अपर पोलीस अधीक्षक भागवत सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

या सापळा कारवाईत पर्यवेक्षक अधिकारी तथा पोलीस उपअधीक्षक अविनाश आनंदराव पाटील, सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक मच्छिंद्र जाधव, पोलीस निरीक्षक सुहास रोकडे, पोलीस हवालदार संजय गोपाळ वाघाटे, विशाल दिलीप नलावडे, दीपक बाळू आंबेकर, महिला पोलीस हवालदार श्रेया सुशांत विचारे, पोलीस शिपाई हेमंत जनार्दन पवार, राजेश वसंत गावकर, महिला पोलीस शिपाई समिता प्रथमेश क्षीरसागर आणि चालक पोलीस हवालदार प्रशांत वसंत कांबळे यांनी सहभाग घेतला.

नागरिकांनी भ्रष्टाचारासंबंधी किंवा लाच मागणाऱ्या लोकसेवकाविरुद्ध कोणतीही तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस उपअधीक्षक अविनाश पाटील यांनी केले आहे.

हेही वाचा