कडूगाव : झाडे लावणे महत्त्वाचे आहेच, मात्र त्यापेक्षा लावलेली झाडे जगविणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. प्रत्येकाने स्वतः लावलेल्या झाडाची मुलाप्रमाणे काळजी घेतली, तरच हरित आणि समृद्ध भवितव्य निर्माण होईल, असे प्रतिपादन लांजा-राजापूर मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांनी केले.

जिल्हा परिषद शाळा कडूगाव आणि शिवसेना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. त्यांच्या हस्ते विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करून या उत्साहपूर्ण कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी मार्गदर्शन करताना किरण सामंत यांनी वाढते प्रदूषण, हवामानातील बदल आणि जंगलतोड यामुळे बिघडत चाललेल्या पर्यावरणाच्या समतोलाकडे उपस्थितांचे लक्ष वेधले.

पर्यावरण संवर्धन हा केवळ एक दिवसाचा कार्यक्रम नसून तो दीर्घकालीन संकल्प आहे. त्यामुळे प्रत्येक गाव, शाळा आणि कुटुंबाने वृक्षसंवर्धनाची जबाबदारी स्वीकारली पाहिजे, असे सांगतानाच उद्याचे जबाबदार नागरिक घडवण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संरक्षणाची जाणीव निर्माण करणाऱ्या अशा उपक्रमांचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.

याप्रसंगी विद्यार्थ्यांनी पर्यावरण संरक्षणाविषयी घोषवाक्ये देत वृक्षसंवर्धनाची शपथ घेतली, तर शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रत्येक रोपाची नियमित काळजी घेण्याचे आवाहन केले. या उपक्रमांतर्गत परिसरात विविध प्रकारची फळझाडे, औषधी वनस्पती तसेच सावली देणारी झाडे लावण्यात आली असून शाळा परिसर अधिक हिरवागार करण्याचा संकल्प सर्वांनी व्यक्त केला.

या कार्यक्रमाला पंचायत समिती सभापती मानसी आंबेकर, जिल्हा परिषद सदस्य संतोष रेवाळे, दिपाली दळवी, विनोद सावंत, अल्ताफ काझी, मनोहर कडू, गुरुप्रसाद पवार, संदेश घगवे, गावकर अभिषेक बडबे, राजा बडबे, आबा बडवे, राजाराम घुगे, पंचायत विस्तार अधिकारी पांचाळ, परशुराम कडू, रविकांत सुर्वे, सुभाष पवार, सुभाष कळंबटे यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ, शिवसेना पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या सक्रिय सहभागामुळे वृक्षारोपणाचा हा उपक्रम गावागावांत पर्यावरण संवर्धनाचा प्रेरणादायी संदेश देणारा ठरला.