रत्नागिरी : जिल्ह्यातील धामणसे येथील रत्नेश्वर ग्रंथालयातर्फे माऊंट एव्हरेस्ट सायकलिंग किताब पटकावणाऱ्या अथर्व शेंड्ये याचा विशेष नागरी सत्कार करण्यात आला.
ग्रंथालयाचे अध्यक्ष उमेश कुळकर्णी आणि सरपंच अमर रहाटे यांच्या हस्ते अथर्वला सन्मानचिन्ह, पुस्तक, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
गणपतीपुळे येथील २० वर्षीय अथर्व शेंड्ये याने टेंबेपूल ते चाळकेवाडी जलशुद्धीकरण केंद्र हा चढ ७० वेळा पार करत ४१ तासांत सलग ५०० किलोमीटरहून अधिक सायकल चालवली, तसेच १०,००० मीटरपेक्षा जास्त उंचीची चढाई पूर्ण करून रत्नागिरी जिल्ह्यासाठी ऐतिहासिक कामगिरी केली आहे.
सत्काराला उत्तर देताना अथर्वने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये उत्तम ताकद असल्याचे सांगत सायकलिंग स्पर्धांच्या माध्यमातून या क्षेत्रात करिअरच्या मोठ्या संधी असल्याचे स्पष्ट केले.
यासाठी रत्नागिरी सायकलिस्ट क्लब सहकार्य करण्यास तयार असून विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन या क्रीडा प्रकारात पुढे यावे, असे आवाहन त्याने केले. याच कार्यक्रमाचे औचित्य साधून ग्रंथालयातर्फे माध्यमिक विद्यालय धामणसें येथील विद्यार्थ्यांना क्रीडा साहित्य, नकाशे आणि कंपास पेटीचे वाटप करण्यात आले.
या सोहळ्याला उपसरपंच ऋतुजा कुळकर्णी, नगरसेविका मेधा कुळकर्णी, रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे कार्यकारिणी सदस्य तथा पत्रकार मकरंद पटवर्धन, रत्नेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्रीकांत देसाई, उपाध्यक्ष अविनाश जोशी, तंटामुक्ती अध्यक्ष विजय निवेंडकर, सोसायटीचे सचिव सुनील लोगडे, दीपक जाधव, ग्रंथालयाचे चिटणीस मुकुंद गणेश तथा बाळासाहेब जोशी, उपाध्यक्ष विलास पांचाळ, केशव कुळकर्णी, प्रशांत रहाटे, विश्वास धनावडे, अनंत जाधव, स्मिता कुळकर्णी, अविनाश लोगडे, अन्वी वारशे, ग्रामपंचायत सदस्य वैष्णवी धनावडे, माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक दत्तात्रय गायकवाड, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका संपदा ढापरे, अंगणवाडी सेविका आणि बचत गट प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश धनावडे यांनी केले.

