दापोली: माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त दापोली शहरात ‘एक दिवस महाराष्ट्राच्या दादासाठी’ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या उपक्रमांतर्गत दापोली शहरातील केळसकर नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ २२ जुलै रोजी सकाळी ८ वाजता नागरिक, कार्यकर्ते आणि पदाधिकारी एकत्र येणार आहेत.
अजित पवार यांच्या शिस्तबद्ध, कर्तव्यदक्ष आणि स्वच्छताप्रिय नेतृत्वाला आदरांजली वाहण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून याप्रसंगी अभिवादन केल्यानंतर शहरातील विविध सार्वजनिक ठिकाणी भव्य स्वच्छता अभियान राबवले जाणार आहे.
शहराला स्वच्छ आणि सुंदर बनवण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या सामाजिक उपक्रमात दापोलीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन अभिवादन करावे, असे आवाहन नगरसेविका साधना बाळासाहेब बोत्रे यांनी केले आहे.

