रत्नागिरी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भाजप महिला मोर्चाच्या वतीने रत्नागिरी दक्षिण येथे ‘देवाभाऊ कृषी माऊली सोहळा’ आयोजित करण्यात आला आहे.

महाराष्ट्र शासनाने आणलेल्या महिला शेतकरी बिलाच्या पार्श्वभूमीवर महिलांना शेतीत आत्मनिर्भर बनवण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवला जात आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महिला प्रदेशाध्यक्षा आमदार चित्रा वाघ यांच्या संकल्पनेतून हा सोहळा २७ तारखेला दुपारी तीन वाजता जिल्हा भाजप कार्यालय, आठवडा बाजार येथे पार पडणार आहे.

या कार्यक्रमादरम्यान ग्रामीण भागातील ४,००० महिलांना विशेष कृषी किटचे मोफत वाटप करण्यात येणार आहे.

महिलांचे श्रम कमी करण्याच्या हेतूने या पर्यावरणपूरक कापडी पिशवीत प्रगत भाजीपाला बियाणे, जैविक खते, खुरपे व विळा ही शेती उपयोगी अवजारे आणि रात्रीच्या सुरक्षिततेसाठी टॉर्चचा समावेश करण्यात आला आहे.

या पिशवीवर देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमेसह भाजप महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश असे मुद्रित केले आहे. तसेच कृषी विज्ञान केंद्र, स्थानिक कृषी अधिकारी आणि कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांमार्फत महिलांना शेतातील मातीचा नमुना घेणे आणि सुपीकता ओळखण्याचे थेट प्रात्यक्षिक दिले जाणार आहे.

या सोहळ्याला रायगड महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष शर्मिला वैकुंठ पाटील आणि परिसरातील महिला शेतकरी उपस्थित राहणार असल्याची माहिती भाजप महिला मोर्चा रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष वर्षा परशुराम ढेकणे यांनी दिली आहे.