दापोली : तालुक्यातील मळे-सुतारवाडी येथे मुसळधार पावसामुळे डोंगराला सुमारे दोन किलोमीटर लांबीच्या आणि दोन ते चार फूट खोल भेगा पडल्याची गंभीर घटना समोर आली आहे.

यामुळे भूस्खलनाचा मोठा धोका निर्माण झाला असून, प्रशासनाने सुतारवाडीतील ग्रामस्थांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे.

या घटनेची माहिती मिळताच दाभोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोरे आणि नायब तहसीलदार देशमुख यांनी महसूल व पोलीस कर्मचाऱ्यांसह प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

महसूल विभागाने या परिसराचा पंचनामा करून सविस्तर अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवला आहे. संभावित दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने नागरिकांना तातडीने सुरक्षितस्थळी हलवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

तसेच डोंगराच्या स्थैर्याची आणि भेगांच्या तीव्रतेची शास्त्रीय तपासणी करण्यासाठी भूवैज्ञानिक तज्ज्ञांच्या पथकाला पाचारण करण्यात आले असून, त्यांच्या अहवालानंतरच पुढील कायमस्वरूपी उपाययोजना निश्चित केल्या जातील.

मुसळधार पाऊस सुरू असल्याने डोंगराच्या पायथ्याशी राहणाऱ्या कुटुंबांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पावसाच्या प्रत्येक सर्रिसोबत डोंगर खचण्याच्या भीतीने ग्रामस्थ रात्र जागून काढत असून, अनेक कुटुंबांनी खबरदारीचा उपाय म्हणून स्वतःहून घरे सोडून सुरक्षित स्थळी आश्रयाला जाणे पसंत केले आहे.

प्रशासनाने नागरिकांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता सतर्क राहण्याचे आणि केवळ अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.