रत्नागिरी : जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा मोठा तडाखा खेड तालुक्याला बसला असून, दहिवली येथील शेलारवाडीत सोमवारी रात्री सव्वानऊच्या सुमारास भीषण भूस्खलनाची घटना घडली.

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे डोंगराचा काही भाग अचानक कोसळून एका कुटुंबाच्या घरावर माती आणि दगडांचा मोठा ढिगारा आला. क्षणात घराचा काही भाग जमीनदोस्त झाल्याने घरातील तिघेजण ढिगाऱ्याखाली अडकले.

घटनेनंतर परिसरातील ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्याला सुरुवात केली. स्थानिकांच्या अथक प्रयत्नातून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या एका ७५ वर्षीय वृद्ध महिलेला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.

त्यांच्यावर सध्या कळबणी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, या भीषण दुर्घटनेत ८५ वर्षीय शांताराम बाळा शेलार आणि ३५ वर्षीय सतीश शेलार हे दोघे अद्याप बेपत्ता असून त्यांचा शोध मंगळवारी उशिरापर्यंत सुरू होता.

दुर्घटनेची माहिती मिळताच प्रशासकीय यंत्रणा तातडीने घटनास्थळी रवाना झाली. प्रांताधिकारी वैशाली पाटील यांच्यासह तहसीलदार, खेड पोलीस, महसूल विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.

ढिगारा हटवून बेपत्ता असलेल्या दोघांचा शोध घेण्यासाठी यंत्रसामग्री आणि मनुष्यबळाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. मात्र, परिसरात अजूनही मुसळधार पाऊस कोसळत असल्याने बचावकार्यात मोठे अडथळे निर्माण होत आहेत.

डोंगराळ भागातील माती सैल झाल्याने परिसरात आणखी भूस्खलन होण्याचा धोका कायम आहे, त्यामुळे प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. प्राथमिक पाहणीनुसार शेलारवाडीसह परिसरातील काही घरे धोकादायक स्थितीत असल्याचे आढळून आले आहे.

या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अनावश्यकपणे घराबाहेर पडू नये आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन स्थानिक प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.