दापोली : तालुक्यात ६ जुलै रोजी मुसळधार पावसाने झोडपून काढले असून सर्वच भागात पावसाची जोरदार नोंद झाली आहे. महसूल विभागाकडून प्राप्त झालेल्या आजच्या आकडेवारीनुसार, तालुक्यात एकाच दिवसात एकूण २१२९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
यामध्ये पालगड भागात सर्वाधिक म्हणजे ३८३ मिलीमीटर पाऊस कोसळला आहे. त्याखालोखाल दापोलीत ३३३ मिलीमीटर, वाकवलीत ३२४ मिलीमीटर, वेळवीत ३०९ मिलीमीटर, दाभोळमध्ये २९९ मिलीमीटर, आंजर्ले येथे २८५ मिलीमीटर तर बुरोडीमध्ये १९६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
या सर्व भागात मिळून आजच्या पावसाची सरासरी ३०४.१४ मिलीमीटर इतकी नोंदवली गेली आहे. या हंगामातील कालपर्यंतच्या पावसाची मागील सरासरी १०१५.१९ मिलीमीटर इतकी होती.
आजच्या मुसळधार पावसामुळे दापोली तालुक्याची आजपर्यंतची एकूण पावसाची सरासरी थेट १३१९.३३ मिलीमीटरवर जाऊन पोहोचली आहे.
या संततधार पावसामुळे स्थानिक जनजीवनावर परिणाम झाला असून, सखल भागात पाणी साचण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

