रत्नागिरी: राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० अन्वये इयत्ता दुसरीच्या पुनर्रचित अभ्यासक्रमाची उर्दू माध्यमातून प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डायट), रत्नागिरीच्या वतीने शिरगाव येथील मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनमध्ये जिल्हास्तरीय शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या प्रशिक्षणाचे उद्घाटन पवित्र कुराण पठनाने करण्यात आले. यावेळी मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनचे प्राचार्य केतन चौधरी, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य सुशिल शिवलकर, वरिष्ठ अधिव्याख्याता दीपा सावंत, समन्वयक व केंद्रप्रमुख मुनाफ गुहागरकर, तज्ज्ञ मार्गदर्शक रेहाना मस्कर, सिंधुदुर्गचे समीर बाग, महिमूलाल तब्बलजी आणि विषय सहाय्यक समन्वयक खालिदा जमादार उपस्थित होते.

उद्घाटनपर भाषणात केतन चौधरी यांनी मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनच्या अभ्यासक्रमाविषयी सविस्तर माहिती दिली आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या यशस्वी अंमलबजावणीसाठी उपस्थित प्रशिक्षणार्थींना शुभेच्छा दिल्या.

या महत्त्वपूर्ण प्रशिक्षणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुमारे ६० उर्दू माध्यम शिक्षक, अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले आहेत. प्रशिक्षणासाठी आवश्यक असलेले परिषद दालन, वर्गखोल्या, निवास व्यवस्था आणि इतर सुविधा मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच काही प्रशिक्षणार्थींची निवास व्यवस्था शिरगावच्या मत्स्य महाविद्यालयात करण्यात आली आहे.

या प्रशिक्षणामुळे शिक्षकांना नवीन अभ्यासक्रमाची सखोल माहिती मिळून त्यांचे अध्यापन अधिक प्रभावी होण्यास मदत होणार आहे. तसेच, शिक्षण क्षेत्रातील विविध संस्थांमधील समन्वय वाढून गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा ठरणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.