रत्नागिरी : शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अमली पदार्थांच्या विरोधात धडक कारवाई करत पोलिसांनी पॉलिटेक्निक कॉलेजच्या मागील बाजूस असलेल्या गगनगिरी मठ रस्त्यावर एका संशयिताला बेड्या ठोकल्या आहेत.
अयुब निजाम कोतवडेकर (वय २९, रा. राजीवडा, रत्नागिरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून ४२ हजार रुपये किमतीचे ३ ग्रॅम ब्राऊन हेरॉईन जप्त करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ४ जुलै रोजी सायंकाळी सव्वासातच्या सुमारास आरोपी अयुब कोतवडेकर हा गगनगिरी मठ रस्त्यावर संशयास्पद स्थितीत फिरताना आढळून आला.
तो हे अमली पदार्थ विक्री करण्याच्या उद्देशाने स्वतःजवळ बाळगत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल निलेश शिवराम शिंगवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीची अंगझडती घेतली. यावेळी त्याच्याकडे ३ ग्रॅम वजनाचे ब्राऊन हेरॉईन सदृश्य अमली पदार्थ सापडले.
पोलिसांनी हे अमली पदार्थ आणि ते ठेवण्यासाठी वापरलेली प्लास्टिक पिशवी असा एकूण ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल घटनास्थळावरून जप्त केला आहे.
याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. कायदा १९८५ च्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ५ जुलै रोजी मध्यरात्री बारा वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी या प्रकरणी रीतसर गुन्हा नोंदवण्यात आला व त्यानंतर अवघ्या ५५ मिनिटांत पोलिसांनी आरोपीला अटक केली.
रत्नागिरी शहरात वाढत्या अमली पदार्थांच्या वापराच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी केलेली ही कारवाई अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात असून, या अमली पदार्थांच्या तस्करीमागे आणखी कोणाचा हात आहे का, याचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

