रत्नागिरी : जिल्ह्यातील खेड तालुक्यातील दहिवली येथील शेलारवाडीमध्ये सोमवारी रात्री भीषण भूस्खलनाची घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी तातडीने आज सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेतला.
दरड कोसळल्याने निर्माण झालेला संभाव्य धोका टाळण्यासाठी घटनास्थळ आणि आजूबाजूच्या परिसरातील सर्व कुटुंबांना तत्काळ सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्याचे आदेश पालकमंत्री उदय सामंत यांनी प्रशासनाला दिले आहेत.
नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत प्रशासनाकडून स्थलांतराची प्रक्रिया वेगाने राबवली जात आहे. यावेळी पाहणी दौऱ्यात त्यांच्यासोबत जिल्हा परिषद सदस्य अण्णा कदम, तालुकाप्रमुख सचिन धाडवे, खेडच्या प्रांतअधिकारी वैशाली माने, उपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश सणस यांच्यासह महसूल आणि पोलीस विभागाचे इतर प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

