गुहागर : तालुक्यातील मौजे काताळे येथील बौद्धवाडी परिसरातील बौद्ध स्मशानभूमीत नवीन विहिरीसाठी सुरू असलेल्या खोदकामामुळे पूर्वजांच्या समाध्या बाधित झाल्याचा गंभीर आरोप अण्णा जाधव यांनी केला आहे.

स्मशानभूमीच्या जवळच आधीच एक शासनमान्य विहीर अस्तित्वात असताना नवीन जागी विहीर खोदण्यास त्यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे.

या खोदकामाच्या निषेधार्थ आणि संबंधितांवर तातडीने कारवाई करण्याच्या मागणीसाठी अशोक पवार यांनी सोमवार, २९ जून २०२६ रोजी गुहागर तहसील कार्यालयासमोर आणि पोलीस ठाण्याशेजारी बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

मजूर रिपब्लिकन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अण्णा जाधव यांनी या उपोषणाला आपला जाहीर पाठिंबा दिला असून रत्नागिरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत प्रशासनाला दिलेल्या सूचना पत्राची सविस्तर माहिती दिली.

या पत्रकार परिषदेत बोलताना अण्णा जाधव यांनी स्पष्ट केले की, स्मशानभूमीच्या परिसरात नवीन विहिरीसाठी सुरू असलेल्या बेकायदेशीर खोदकामामुळे समाजाच्या पूर्वजांच्या समाध्यांचे नुकसान झाले असून आणखी नुकसान होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

आधीच एक विहीर असताना नवीन विहिरीचे काम सुरू करण्यामागे हेतुपुरस्सर जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला.

या प्रकारामुळे समाजाच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे नवीन जागी विहीर खोदण्याचे काम तत्काळ थांबवावे आणि या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्यात यावी, अशी जोरदार मागणी त्यांनी केली आहे.

तसेच या चौकशीत दोषी आढळणारे संबंधित अधिकारी, ग्रामपंचायत पदाधिकारी आणि जबाबदार व्यक्तींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, स्मशानभूमीचे संरक्षण करून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी योग्य ती उपाययोजना करावी आणि समाज प्रतिनिधींना सुनावणीची संधी द्यावी, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.

अशोक पवार यांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार बेमुदत उपोषण सुरू केल्याने आता प्रशासनावर मोठा दबाव निर्माण झाला आहे. वंचित बहुजन आघाडीचे माजी उत्तर जिल्हाध्यक्ष असलेल्या अण्णा जाधव यांनी स्मशानभूमीचे पावित्र्य आणि समाजाच्या धार्मिक भावनांचा सन्मान राखणे ही पूर्णपणे प्रशासनाची जबाबदारी असल्याची आठवण करून दिली.

रत्नागिरीत झालेल्या या पत्रकार परिषदेला प्रकाश धोंडीराम पवार, धर्मानंद यादव, मिलिंद पवार आणि रवींद्र पवार उपस्थित होते.