दापोली: तालुक्यातील मुरुड येथील विरंगुळा बीच रिसॉर्टमध्ये पावसाळ्याच्या प्रारंभीच एका अतिशय दुर्मिळ आणि आकाराने विशाल असलेल्या पतंगाचे दर्शन झाले असून या कीटकाने सध्या रिसॉर्टमध्ये आलेल्या पर्यटकांचे विशेष लक्ष वेधून घेतले आहे.
वरील छायाचित्रात दिसणारा पतंग हा ‘ॲटलस मॉथ’ (Atlas Moth) या प्रजातीचा असून तो जगातील सर्वात मोठ्या पतंगांपैकी एक मानला जातो.
याच्या पंखांचा विस्तार खूप मोठा असतो आणि पंखांच्या कडा सापाच्या डोक्यासारख्या दिसतात, ज्यामुळे परभक्षकांपासून त्याचे नैसर्गिक रक्षण होते.
सध्याच्या नैसर्गिक परिस्थितीत या प्रजातीच्या पतंगांची संख्या कमी होत असून वाढते शहरीकरण, प्रदूषण आणि त्यांच्या नैसर्गिक अधिवासाचा होत असलेला नाश यामुळे ते दुर्मिळ होत चालले आहेत.
निसर्गाचा अद्भुत चमत्कार मानला जाणारा हा पतंग प्रौढ अवस्थेत आल्यावर त्याला तोंड किंवा अन्ननलिका नसते, त्यामुळे तो काहीही खाऊ शकत नाही.
अळ्यांच्या अवस्थेत साठवलेल्या ऊर्जेवरच तो केवळ एक ते दोन आठवड्यांचे अत्यंत अल्प आयुष्य जगतो आणि प्रजननाचे एकमेव कार्य पूर्ण करतो.
पावसाळ्याच्या सुरुवातीला या दुर्मिळ कीटकाचे दर्शन निसर्गप्रेमी आणि पर्यटकांसाठी एक पर्वणीच ठरली असून परिसरातील जैवविविधतेचे संवर्धन करण्याची गरज या सुखद घटनेच्या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

