रत्नागिरी : जिल्ह्यात मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर कडक बंदोबस्त तैनात असताना रत्नागिरी पोलिसांनी अवैध गोमांस विक्रीवर मोठी कारवाई केली आहे. उद्यमनगर येथील लांजेकर नगर परिसरात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने छापा टाकून एका व्यक्तीला अटक केली असून त्याच्याकडून ५१ किलोहून अधिक गोमांस आणि इतर साहित्य असा लाखभराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मोहरम सणाच्या अनुषंगाने २६ जून रोजी संपूर्ण जिल्ह्यात पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या सूचनेनुसार चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. याच दरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक शहरात गस्त घालत असताना लांजेकर नगर येथे लियाकत शौकत दावत (वय ४८, रा. लांजेकर नगर, उद्यमनगर) हा विनापरवाना गोमांस स्वतःच्या फायद्यासाठी विक्रीकरिता बाळगून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी तत्काळ कारवाई करत त्याला पंचांसमक्ष ताब्यात घेतले. पशुधन विकास अधिकाऱ्यांकडून जप्त केलेल्या मांसाची प्राथमिक खात्री करून घेण्यात आली. या कारवाईत पोलिसांच्या पथकाने ५१ किलो ५०० ग्रॅम गोमांस, एक दुचाकी आणि एक डीप फ्रीझर असा एकूण १ लाख ६ हजार ४८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणी आरोपी लियाकत दावत याच्या विरोधात रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम ३२५, सह महाराष्ट्र पशुसंरक्षण (सुधारणा) अधिनियम २०१५ आणि मोटार वाहन कायद्याच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे अधिकारी व अंमलदार संदीप ओगले, स्वाती राणे, विजय आंबेकर, योगेश नार्वेकर, गणेश सावंत, सत्यजित दरेकर आणि अतुल कांबळे यांच्या पथकाने केली.

