रत्नागिरी: प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंड येथे राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कर्मचारी प्रशिक्षण कार्यक्रम नुकताच पार पडला.

या प्रशिक्षणामध्ये मोहिमेची उद्दिष्टे, लसीकरणाची कार्यपद्धती, लाभार्थी मुलांची नोंदणी आणि घरभेटी दरम्यान घ्यावयाची काळजी याविषयी कर्मचाऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

या प्रशिक्षण कार्यक्रमात वैद्यकीय अधिकारी सुनीता पवार, ऋषीकेश डोके, आरोग्य सहाय्यक परशुराम निवेंडकर, बारिंगे तसेच आरोग्य सहाय्यिका पाडवी यांनी मार्गदर्शन केले.

त्यांनी पल्स पोलिओ मोहिमेचे महत्त्व अधोरेखित करत शून्य ते पाच वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकापर्यंत पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पोहोचविण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन केले.

याप्रसंगी समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, गटप्रवर्तक अडावं यांच्यासह आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

या प्रशिक्षणामुळे आगामी काळात राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेची अधिक प्रभावी अंमलबजावणी होण्यास मदत होणार असल्याचा विश्वास आरोग्य विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.