स्वप्नापलिकडची एव्हरेस्ट वारी..भाग – २
१५ मे रोजी पुण्यातून रात्रीचे विमान काठमांडूला आम्हाला नेणार होते. मूळ नियोजनानुसार मी आणि सौ १५ मे रोजी सकाळी रत्नागिरीतून पुण्याला निघणार होतो.
सहकारी गायकवाडसाहेब मात्र, एक दिवस आधीच निघणार होते. त्यांचे वडील बंधू ‘दादां’ च्या लग्नाचा वाढदिवस 15 तारखेला होता. या कौटुंबिक सोहळ्याचे आवतण आम्हालाही होते. या सर्वांचा विचार करुन गायकवाडसाहेबांसोबत १४ मे च्या रात्रीच निघण्याचा निर्णय आम्ही दोघांनी घेतला.
आम्हाला पुण्याला सोडण्यासाठी कस्टम अधिकारी रत्नसार ढगारे आधीच तैनात होते. आशय (गायकवाड साहेबांचा पुतण्या) तो देखील आलेला.

अतिशय उत्साही व प्रसन्न वदनाने आम्ही सगळे पुण्याकडे निघालो. वाटेत सावर्डेजवळ निरज यांच्या हॉटेलवर जेवण केले. आता दुसरे स्वतंत्र वाहन घेवून निरजही आमच्या ताफ्यात सामील झाले.
मजल-दरमजल करत, धापा टाकत आमची दोन वाहने रात्रीच्या निरव शांततेत घाट रस्त्याने पुणे जवळ करत होती. यावेळी आशय आमचा सारथी होता. दोन्ही वाहन चालकांच्या नावावर वाटेत फक्कड चहा आम्ही सर्वांनी घेत पुणे जवळ केले.
जी अभ्यासक्रमाची पुस्तके वाचून इथपर्यंत पोहचलो, त्या ऐतिहासिक ‘बालभारती’ च्या विश्रामगृहात पहाटे पोहचलो. दुसऱ्या दिवशी सकाळी खूप वर्षांनी किरण केंद्रे ची भेट झाली. योगायोगाने माजी संचालक प्रल्हाद जाधव सरांचा किरणला फोन आलेला.
त्यावर ते माझ्याशीही बोलले. मी इबीसीला जातोय हे ऐकून ते माझ्याशी दहा मिनीटे बोलले. त्यांनी इबीसी पूर्ण केल्याचे सांगून, ‘दररोज एक फोटो मला पाठव’, असे आग्रहाने त्यांनी सांगितले.
‘दादां’ च्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त विमानतळानजिक विमाननगरला फिनिक्स मॉलमधील एका अलिशान रेस्टाँरंटमध्ये स्नेहभोजनाचे आयोजन केले होते. गायकवाड परिवाराचा गोतावळा जमलेला. त्यात आम्ही सर्वजण विरघळून गेलेलो.

हा सोहळा आटोपून पुणे विमानतळावर पोहचलो. समस्त गायकवाड परिवार आम्हाला निरोप द्यायला आलेला. विशेषत: साहेबांच्या मातोश्रींची उपस्थिती मनाला स्पर्शून गेली.
आमच्या सात जणांच्या पथकातील विशाल मेहता हे आधीच पोहचलेले होते. नुपूर आणि अक्षय ही जोडी प्रवासात होती. त्यांची वाट पहात आमचे फोटोसेशन चाललेले.
साहेबांच्या कन्या जिशा आणि जाणीवा यांनी गुलाब पुष्प देवून आम्हाला मोहिमेसाठी शुभेच्छा दिल्या. रात्रीचे साडे दहा वाजलेले. निरोपाचा सोहळा संपवून आम्ही विमानतळाच्या आत प्रवेश केला. बोर्डींग पास घेतले.
चेक इन, सुरक्षा तपासणी याचे सोपस्कार पूर्ण करुन गेट क्रमांक 6 वर स्थिरावलो. बऱ्याच वेळाने गेट क्रमांक अचानक बदलले गेले. आमचे विमान गेट क्रमांक ८ वर येणार असल्याचा फलक चमकू लागला.
घुमणाऱ्या आवाजात उद्घोषणा झाली आणि गेट क्रमांक ८ वरुन बोर्डींग पास तपासून आम्हा सर्वांना विमानात सोडण्यात आले. मध्यरात्र उलटून दुसरा दिवस सुरु झालेला.
कप्तान बिपीन आणि सह कप्तान पंकज यांनी घोषणा केली, ‘पुणे ते दिल्ली उडान दोन तासात पूर्ण केली जाईल.’ सोबत विमानात विलिंडा, कुमकुम, श्वेता आणि सिमरन या केबिन क्रु असणार असल्याची उद्घोषणा ऐकायला मिळाली.
विमानात चार-चार हवाई सुंदरी असल्याचे ऐकून मी सहजच मिश्कीलपणे सौ ला म्हणालो, ‘विमानात चार हवाई सुंदरी आहेत हं!’ त्यावर तिनेही तितक्याच हजरजबाबीपणे टोमणा मारला ‘एक तर तुझ्या बाजूलाच बसली आहे!’ तिच्या या उत्तराने मी जागेवरच गपगार झालो. खरतरं त्या चारपैकी दोन नावे तिनेच मला ऐकून सांगितली होती.
निर्धारित वेळेपेक्षा २० मिनिटे उशिरा आमचे विमान धावपट्टीकडे निघालेले होते. सुरक्षा नियमांची सूचना देणाऱ्या उद्घोषणेवर केबीन क्रू प्रात्यक्षिके दाखवत होती. धावपट्टीकडे जाणाऱ्या विमानात एका पाठोपाठ एक उद्घोषणा सुरु होती.
‘केबीन लाईट कम की जाएगी’, आणि आतील प्रकाश मंदावला. आतल्या आत जणू टीपूर चांदणं पडल्याचा भास झाला. रिव्हर्स गियरमधून बाहेर पडत विमान धावपट्टीवर जाण्यास आतुरलेले होते. ते गतीने धावू लागले. एका क्षणी पृथ्वीवरुन काढता पाय घेत ते आकाश कवेत घेण्यास अवकाशात झेपावले.
विमान बाहेर झेपावले तसे आतून पेंगुळलेल्यांचा ‘झोपावल्या’ चा प्रत्यय आला. झोपमोड झालेल्या बाळाने अनेकांचा वरच्या पट्टीत लागलेला ‘खर्ज’ तोडायला सुरुवात केली.
सुटलेली तार क्षणार्धात पुन्हा जोडली गेल्याने जागोजागी त्याचे ‘स्वर’ सुस्कार ऐकू येण्यास सुरुवात झालेली. माझ्या बाजूला बसलेल्या माझ्या प्रिय हवाई सुंदरीनेही तिच्या परीने ‘सुरात सूर’ मिसळलेला.
पुण्याचा पसारा मागे सुटत गेला. एरव्ही जमिनीवरुन आकाशात दिसणारे नभांगण आता आकाशातून जमिनीवर अवतरल्यासारखे भासत होते. त्या अंधःकारमय, अथांग अवकाशात विमानाबरोबर मी ही गडप होवून गेलो.
‘खराब मौसम..’ कप्तानाचा हा आवाज ऐकला तसा मी गडपेतून जागा झालो. पहाटेचे सव्वा तीन वाजलेले. दिवसभर प्रदूषणाच्या धुराड्यात धावणारी दिल्ली शांतपणे पहुडलेली दिसत होती.
अंगणातून आकाशात तारकापुंजाचे झुंबर दिसावे, अगदी तसे खाली दिल्लीचा नजारा दिसत होता. तारकापूंज गडद होत गेला. हळूहळू गावं जवळ येत खुणावू लागली.
धावून दमलेले निद्राधीन विमान जमिनीच्या खांद्यावर पाय रोवण्यासाठी आसुसलेले होते. त्यासाठी ते एकदा उजव्या बाजूला तर एकदा डाव्या बाजूला कूस बदलत खाली उतरु पहात होते.
झुंबर तुटून ते इतस्ततः पसरावे त्याप्रमाणे जमिनीवरचा विस्तीर्ण देखावा नजरेत भरत होता. ‘आपण जमिनीवर पाय ठेवतोय’, अशी लँडींगची उद्घोषणा झाली. ठिपके दिसणाऱ्या इमारती मोठ्या गडद होत गेल्या. जमिनीला चाकांचे पाय रोवून विमान यशस्वीपणे दिमाखात उभे राहिले.
काठमांडूला जाणारे आमचे विमान टर्मिनल ३ वर उभे होते. तेथे जाण्यासाठी शटल बस उभी होती. या बसमधून १५ मिनिटानंतर आम्ही तेथे पोहचलो.
बहुतेकजण ‘इबीसी’ ट्रेकला जात असल्याचे बसमधून जाणवले होते. इमिग्रेशननंतर पुन्हा कडक सुरक्षा तपासणीला सामोरे जावे लागले. यावेळी बूटदेखील काढावा लागला. ४ – सी वर प्रचंड गर्दी होती.
विमान ७-०५ वाजता धावपट्टीकडे निघाले. धावणाऱ्या चाकांनी अधिक गती घेत मधूनच आपले पाय पोटात घेत विमानाने जमिनीची साथ सोडली.
तसे आम्ही सगळे आता ‘हवेत’ होतो. एअर इंडियाच्या या आंतरराष्ट्रीय विमानात सुरुवातीलाच एका बाजूला, चार तर दुसऱ्या बाजूला चार अशी ‘बिझीनेस’ क्लास बैठक व्यवस्था होती.
त्यानंतर ‘प्रिमियम इकॉनॉमी’ आणि शेवटी ‘इकॉनॉमी’क्लास व्यवस्था होती.
काही वेळातच कप्तानाच्या उद्घोषणेनंतर केबीन क्रू ने ‘व्हेज, नॉनव्हेज’ची विचारणा करुन स्वादिष्ट नाश्ता देण्यास सुरुवात केली. कॉफी, आम्लेट, मिश्र फळांसह दही, अमूल बटर वगैरेंचा त्यात समावेश होता.
याचा आस्वाद घेत आमचा प्रवास पुढे सरकत राहिला. काही वेळात कप्तानाचा गंभीर पण उत्साही आवाज पुन्हा ऐकायला मिळाला.
‘लँडींग की तैयारी कर रहे है..’ कप्तानाच्या या उद्घोषणेनंतर काही वेळातच काठमांडूच्या ‘त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर’ लँड झालो. भगवान गौतम बुध्दांच्या भूमीत उतरलो.
आम्ही ‘हवेतून’ थेट ‘जमिनीवर’ आलो..जगातील सर्वाधिक उंच असणाऱ्या शिखराच्या पायथ्याशी जाण्यासाठी..!
– कुसुमानंद (प्रशांत कुसुम आनंदराव सातपुते)
9403464101

