स्वप्नापलिकडची एव्हरेस्ट वारी… भाग – ३
विमानतळाच्या आतमध्ये भगवान गौतम बुद्धांची सोनेरी रंगातील अत्यंत देखणी, आकर्षक मूर्ती लक्ष वेधून घेत होती. तिच्यासमवेत छायाचित्रं टिपून आम्ही सामान घेवून विमानतळाच्या बाहेर आलो.
ज्या ‘करवीर हायकर्स’च्या माध्यमातून हा ट्रेक आम्ही सर्वजण करत होतो, त्याची संचालक आणि आमच्या पथकाची नेतृत्त्व करणारी कस्तुरी ही आधीच एक दिवस काठमांडूत आलेली.
वयाच्या २१ व्या वर्षी एव्हरेस्ट सर करणाऱ्या आणि जगातील मृत्यूचा पर्वत अशी ओळख असणारा ‘अन्नपूर्णा’ पर्वत पार करणारी जगातील सर्वात तरुण कस्तुरी सावेकर हिच्या मार्गदर्शन आणि नेतृत्त्वाखाली आमची ईबीसी मोहीम प्रत्यक्षात उद्यापासून सुरु होणार होती.

पुढील १५ दिवस संपूर्ण नियोजन नेपाळमधील 15 पीक अॕडव्हेंचर चे योगेंद्र तमांग हे करणार होते. शिवाय प्रशांत तमांग हे ‘गाईड’ च्या भूमिकेत असणार होते.
ही सर्व मंडळी आमच्या स्वागतासाठी विमानतळा बाहेर आलेली. योगेंद्र यांनी आणलेले झेंडूचे हार आमच्या प्रत्येकाच्या गळ्यात घालून, त्यांनी अनोखे स्वागत केले.
सर्व सामान वाहनात ठेवून आम्ही थमेल भागातील ‘काठमांडू बिझीनेस हाॕटेल’वर पोहोचलो. नक्षीदार कलाकुसर लाकडी चौकटीवर कोरुन, एखाद्या प्राचिन मंदिराप्रमाणे अविष्कार घडवलेला.
अंतर्गत सजावट स्थानिक संस्कृतीचे दर्शन घडवत होती. मुख्य कौंटरवर दोन लाकडी मूषक ठेवलेले.
बाजूला हिरव्या रंगातील एक अतिशय देखणी लाकडी मूर्ती लक्ष वेधून घेत होती. ती बौद्ध धर्मातील ‘आर्य तारा’ – हरित तारा देवीची होती.

ही देवी प्रामुख्याने तिबेटी बौद्ध धर्मात अत्यंत पूजनीय आहे. तिचा हिरवा रंग सक्रियता, दया आणि संकटातून त्वरित सुटका करण्याचे प्रतीक मानला जातो. या मूर्तीचा डावा पाय दुमडलेला आणि उजवा पाय खाली सोडून एका लहान कमळावर स्थिरावलेला होता.
तिचा उजवा हात ‘वरद मुद्रेत’ दानाचा हात खाली झुकलेला होता, जो आशीर्वाद आणि वरदान देतो. डावा हात छातीपाशी ‘अभय मुद्रेत’ किंवा ज्ञान मुद्रेत होता, जो संरक्षणाचे आश्वासन मानला जातो.
तिच्या दोन्ही खांद्यांच्या बाजूला उमललेली कमळाची फुले होती. त्यापैकी एक ज्याला ‘उत्पला’ किंवा निळे/रात्रीचे कमळ म्हणतात, जे पवित्रतेचे प्रतीक मानले जाते, ते होते. चबुतऱ्यावर दोन सिंह दाखवण्यात आलेले होते. केलेले कोरीव काम आणि उत्कृष्ट रंगकाम या मूर्तीचे सौंदर्य अधिकच वाढवत होते.

या मोहक मूर्तीचे छायाचित्र घेण्यापासून स्वतःला रोखू शकलो नाही. त्याचबरोबर या हाॕटेलच्या प्रवेशद्वारावरही आम्ही सर्वांनी एकत्रित फलकाच्या पार्श्वभूमीवर अतिशय उत्साहात छायाचित्रं घेतली.
गायकवाडसाहेबांचे बालमित्र आप्पासाहेब मुंडासे हे मुरुन गावावरुन हैद्राबाद मार्गे काठमांडूत पोहचलेले. त्यांचे वैशिष्ट्यं म्हणजे अगदी शेवटच्या क्षणात अवघ्या एका विचारण्यावर ते या ट्रेकसाठी सामील झालेले.
केवळ लेह-लदाख केलेल्या पात्रतेवर चक्क इबीसीला ते आमच्या पथकात सहभागी झालेले. त्यांचा हा रांगडेपणा प्रत्येकाला पुढील दिवसात सर्वांना भावून गेलेला.
दुसऱ्या दिवशी पहाटे पाचलाच आम्ही सर्वजण एकत्र जमलो. १५ मिनिटात काठमांडू डोमेस्टिक विमानतळावर पोहोचलो. येथून १९ सीटर विमानाने जगातील सर्वात धोकादायक असणारे विमानतळ ‘लुकला’ येथे प्रवास होणार होता. आज आमचे नशीब चांगले होते.

हवामान स्वच्छ असल्याने विमान उडणार होते. या ठिकाणी इबीसीला जाणारा एक मलेशीयन पिता आपल्या अवघ्या ६ वर्षाची व्हायलेट आणि ९ वर्षांच्या इमरोज या दोन मुलींसोबत भेटला.
आमच्या सर्वांची तिकिटे काढून सुरक्षा तपासणीचे सोपस्कार पूर्ण केले. धावपट्टीकडे जाताना सूर्याबा चमकत वर येत होता. ते टिपून घेतले. आता आम्ही सर्वजण आम्ही ‘समीत एअर’ च्या विमानात बसलो होतो.
या छोट्या विमानाने सराईत पक्षाप्रमाणे हवेत उडान केलेले. अवकाशात ढग एकमेकांशी पाठशिवणी खेळत होते. पांढरे, निळे, धुरकट अशा त्यांच्या छटा एकमेकात मिसळत होत्या.

विमानाच्या पंखावर तेजस्वी सूर्य खडा चमकत होता. दूरवर पर्वताच्या तोंडाला लोणी माखलेले. त्याचा तो ओघळ, ती हिमरेषा हळूच सरकलेल्या ढगांच्या पडद्यांमधून स्पष्ट दिसत होती.
लुकला ला उतरल्यावर हवेत कमालीचा गारठा जाणवला. अगदी हुडहुडी भरवणारा तो होता. या ठिकाणी परदेशी गिर्यारोहक संख्येने दिसत होते.
येथील हाॕटेलच्या टेरेसवर निसर्ग सौंदर्य छायाचित्रात बंदिस्त करण्यात आम्ही बराचवेळ व्यस्त होतो. वातावरण क्षणार्धात ढगाळ बनलेले.

थंडीने काकडून आम्ही रेस्टाॕरंटमध्ये जमलो. गरमागरम नाश्ता केला. गरम पाण्याचे थर्मास भरले आणि आम्ही नऊ किमी अंतर कापण्यास सज्ज झालो.
– कुसुमानंद (प्रशांत कुसुम आनंदराव सातपुते)
9403464101

