दापोली: युवासेना दापोली तालुका अध्यक्ष सुमित जाधव यांची युवासेना दापोली विधानसभा क्षेत्राच्या संपर्क प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे.
या निवडीमुळे शिवसेना आणि युवासेना पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, जाधव यांच्यावर दापोली तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
सुमित जाधव यांनी गेल्या अनेक वर्षांपासून युवासेनेच्या माध्यमातून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय कार्य केले आहे.
जनहिताचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि युवकांना संघटित करण्यासाठी त्यांनी विविध सामाजिक उपक्रम व जनजागृती मोहिमा राबवल्या आहेत.
स्थानिक समस्यांच्या निराकरणासाठी त्यांनी घेतलेली आक्रमक भूमिका आणि त्यांच्या संघटनात्मक कौशल्याची दखल घेत पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर ही नवीन आणि महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.
या नियुक्तीमुळे दापोली विधानसभा क्षेत्रात युवासेनेची बांधणी अधिक भक्कम होईल आणि आगामी काळात युवकांमध्ये नवीन चैतन्य निर्माण होईल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
सुमित जाधव यांच्या या निवडीबद्दल शिवसेना व युवासेनेचे वरिष्ठ नेते आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

