डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत येणाऱ्या रत्नागिरी येथील सागरी जीवशास्त्र संशोधन केंद्र (MBRS), झाडगाव येथे गुरुवारी दापोलीतील १६ पत्रकारांनी विशेष प्रक्षेत्र भेट दिली.
दक्षिण कोकण किनारपट्टीवरील मत्स्यव्यवसाय आणि संशोधन कार्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने या दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी केंद्र प्रमुख व वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी के. जे. चौधरी यांनी पत्रकारांचे स्वागत केले.
त्यांनी दक्षिण कोकण किनारपट्टीच्या मत्स्यव्यवसाय विकासामध्ये संशोधन केंद्राचे महत्त्व अधोरेखित केले. मत्स्य संवर्धन, सागरी जीवांचे जतन आणि मच्छिमारांचे उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्र करत असलेल्या उपक्रमांची माहिती त्यांनी दिली.
यावेळी पत्रकारांनी केंद्राच्या मत्स्यालय, मत्स्य-संग्रहालय आणि जलपर्यटन प्रकल्पांना भेट देऊन माहिती घेतली.

विद्यापीठाचे एस. डी. देसाई यांनी या दौऱ्याचे नियोजन केले. या भेटीमुळे विद्यापीठाचे संशोधन आणि तंत्रज्ञान सामान्य मच्छिमार व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे.
या कार्यक्रमासाठी कुलगुरू संजय भावे, विस्तार शिक्षण संचालक राजेश ठोकळ आणि संशोधन संचालक प्रशांत शहारे यांचे मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी केतन चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली आसिफ पागारकर, हरीश धमगये, सचिन साटम तसेच कर्मचारी वृंदाने परिश्रम घेतले.

