दापोली : देशभरात गोसंवर्धन आणि गोसंरक्षणासाठी जनजागृती करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या ‘गो सम्मान आह्वान अभियान’ अंतर्गत दापोली तहसीलदारांना सविस्तर निवेदन देण्यात आले.
भारतीय संस्कृतीतील गोमातेचे महत्त्व विचारात घेऊन केंद्र शासनाने यासंदर्भात ठोस धोरणात्मक पावले उचलावीत, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
भारतीय संस्कृतीत गोमाता ही श्रद्धा आणि जीवनपद्धतीचे केंद्र आहे. ग्रामीण अर्थव्यवस्था, शेती आणि पर्यावरणीय संतुलनात गायींचे योगदान मोठे आहे.
मात्र, सध्याच्या काळात प्रदूषण, वाढती कत्तल आणि इतर कारणांमुळे गोवंशावर संकट निर्माण झाले आहे. यावर उपाय म्हणून संपूर्ण देशात एकसमान राष्ट्रीय धोरण राबविणे गरजेचे असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
संविधानातील कलम ४८ नुसार राज्याने गोवंश संरक्षणासाठी पावले उचलणे अपेक्षित असून, गोवंश कत्तल प्रतिबंधासाठी कठोर कायद्याची अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनात गोवंशाला ‘कायदेशीर व्यक्ती’ (Legal Person) हा दर्जा मिळावा आणि गोसंवर्धनासाठी स्वतंत्र केंद्रीय मंत्रालयाची स्थापना करावी, अशा प्रमुख मागण्यांचा समावेश आहे.
स्वतंत्र मंत्रालय स्थापन झाल्यामुळे देशपातळीवर धोरणांची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे होईल, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
निवेदन सादर करताना मिलिंद शेठ, सचिन गायकवाड, प्रमोद पांगारकर, राकेश भांबिड, सुनंदन भावे, रोहन केळस्कर, प्रदीप शेठ, सुरेश रेवाळे, संतोष गवळी, ओमकार वेल्हाळ, सुजल जयस्वाल आणि इतर गोरक्षक उपस्थित होते.
या अभियानास संत समाज आणि विविध सामाजिक संघटनांनी पाठिंबा दर्शविला असून नागरिकांनीही यात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

