पुणे: दापोली तालुक्यातील वाकवली येथील तुषार श्रीधर महाडीक यांना पुणे येथे आयोजित ‘महाराष्ट्र रत्न सन्मान सोहळा २०२६’ मध्ये ‘आदर्श वन्यजीव रक्षक’ पुरस्काराने गौरवण्यात आले.

नालंदा ऑर्गनायझेशनच्या वतीने करण्यात आलेल्या सर्वेक्षणात महाडीक यांनी वन्यजीव संरक्षण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत ही निवड करण्यात आली.

हा सोहळा २५ एप्रिल २०२६ रोजी नवी पेठ येथील पत्रकार भवनमध्ये राज्यभरातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

तुषार महाडीक हे ‘वाईल्ड ॲनिमल रेस्क्युअर आणि रिसर्च’ संस्थेचे सचिव म्हणून कार्यरत असून गेल्या अनेक वर्षांपासून वन्यजीव संरक्षण, जखमी प्राण्यांचे बचावकार्य आणि वन्य प्राण्यांवरील अन्यायाविरोधात काम करत आहेत.

त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून शाळा, महाविद्यालये आणि गावागावांत जाऊन वन्यप्राण्यांबाबत जनजागृती करण्याचे महत्त्वाचे कार्य त्यांनी केले आहे.

विशेषतः साप, पक्षी आणि इतर वन्य प्राण्यांना सुरक्षितरीत्या रेस्क्यू करून त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडणे तसेच जखमी प्राण्यांवर उपचार करण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असतात.

त्यांच्या या कार्यामुळे पर्यावरण संवर्धनास मोठा हातभार लागला असून अनेक वन्यजीवांचे प्राण वाचले आहेत. या सन्मान सोहळ्यावेळी त्यांचे आई-वडील आणि मित्रपरिवार उपस्थित होता.

महाडीक यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल दापोली परिसरातून त्यांचे अभिनंदन होत असून, त्यांचे कार्य तरुण पिढीसाठी प्रेरणादायी ठरत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.