दापोली: ‘दिशा महाराष्ट्राची’ या संस्थेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त आयोजित राज्यस्तरीय चौथ्या ‘कलाविष्कार’ कवी संमेलनात आणि पाचव्या राज्यस्तरीय सन्मान सोहळ्यात दापोलीचे सुधीर महादेव कालेकर यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय ‘समाजरत्न’ पुरस्कार २०२६ देऊन गौरविण्यात आले.

समाजकारण, राजकारण, शिक्षण आणि सहकार क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामाची दखल घेऊन कालेकर यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. राज्यभरातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी साहित्य, सामाजिक कार्य, कला आणि संस्कृती क्षेत्रातील व्यक्तींनाही सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमात आयोजित ‘कलाविष्कार’ कवी संमेलनात राज्यातील विविध भागांतील कवी आणि साहित्यिकांनी सहभाग घेऊन काव्यरचना सादर केल्या, ज्याला श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या पुरस्कारानंतर कालेकर यांचे दापोली परिसरात अभिनंदन होत असून, दापोली तालुक्याचे नाव राज्यस्तरावर पोहोचल्याची भावना व्यक्त होत आहे. आगामी काळातही समाजहिताचे कार्य सुरू ठेवणार असल्याचे कालेकर यांनी यावेळी सांगितले.