रत्नागिरी : कोल्हापूरहून रत्नागिरीत विक्रीसाठी आणला जाणारा प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाल्याचा मोठा साठा शहर पोलिसांनी पकडला आहे.
या कारवाईत पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून मुद्देमालासह गुन्ह्यात वापरलेली इको गाडी असा एकूण ६ लाख ७७ हजार ९०४ रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, कोल्हापूरमधील एक व्यक्ती पहाटेच्या सुमारास मोठ्या प्रमाणात गुटखा घेऊन रत्नागिरीत येणार होती.
या माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक महामुनी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांनी विशेष पथक तयार केले.
या पथकाने शहरात सापळा रचून शरद गणपती भंडारे (रा. सरुड, ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर) याला ताब्यात घेतले.
त्याच्या ताब्यातील इको गाडीची झडती घेतली असता ३ लाख २७ हजार ९०४ रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाला मिळून आला.
पोलिसांनी ३ लाख ५० हजार रुपये किमतीची गाडी आणि गुटखा असा एकूण ६ लाख ७७ हजार ९०४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

