माझी वसुंधरा ५.०’ अभियानात राजापूर नगरपरिषदेची बाजी; जिल्ह्यात प्रथम तर राज्यात १३ वा क्रमांक

राजापूर: ‘माझी वसुंधरा अभियान ५.०’ मध्ये राजापूर नगरपरिषदेने चमकदार कामगिरी करत जिल्ह्यात प्रथम, कोकण विभागात द्वितीय आणि राज्यस्तरावर १३ वा क्रमांक पटकावला आहे.

या यशामुळे शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून सर्व स्तरांतून राजापूर नगरपरिषदेचे कौतुक होत आहे.

नगरपरिषदेने पर्यावरण संवर्धनासाठी राबवलेल्या विविध उपक्रमांची दखल घेत हे मानांकन जाहीर करण्यात आले आहे.

शहरात राबवण्यात आलेली स्वच्छता मोहीम, मोठ्या प्रमाणावरील वृक्षारोपण, प्लास्टिकमुक्तीचा निर्धार, पाणी संवर्धन आणि प्रभावी घनकचरा व्यवस्थापन यांमुळे राजापूरला हे यश संपादन करता आले.

हे यश केवळ प्रशासनाचे नसून राजापूरमधील प्रत्येक नागरिकाचे आहे, असे मत नगराध्यक्ष हुस्नबानू खलिफे यांनी व्यक्त केले.

पर्यावरण रक्षणासाठी नागरिकांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळेच ही झेप घेणे शक्य झाल्याचे त्यांनी नमूद केले. या अभियानात नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी आणि पदाधिकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

या यशामुळे नगरपरिषदेचा नावलौकिक वाढला असून, आगामी काळातही पर्यावरण रक्षणाची ही चळवळ अशीच सुरू ठेवण्याचा निर्धार हुस्नबानू खलिफे आणि आरोग्य सभापती सुलतान ठाकूर यांनी व्यक्त केला आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*