
रत्नागिरी : पर्यावरणाचे रक्षण आणि हवामान बदलाच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या पर्यावरण आणि हवामान बदल विभागाने ‘माझी वसुंधरा अभियान ६.०’ जाहीर केले आहे.
राज्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील नैसर्गिक परिसंस्थेचे संवर्धन करण्यासाठी हे देशातील पहिलेच एकात्मिक अभियान असून, यामध्ये लोकसहभागावर विशेष भर देण्यात आला आहे.
हे अभियान प्रामुख्याने निसर्गाच्या पंचमहाभूतांवर म्हणजेच पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या पाच तत्त्वांवर आधारित आहे. कार्बन शोषण, हरितगृह वायू उत्सर्जन कमी करणे आणि नागरिकांमध्ये शाश्वत जीवनशैलीचा प्रसार करणे ही या अभियानाची तीन मुख्य उद्दिष्टे आहेत.
विशेष म्हणजे, हे अभियान संयुक्त राष्ट्रांच्या १७ शाश्वत विकास उद्दिष्टांशी (SDGs) सुसंगत असून, त्याद्वारे सामाजिक आणि आर्थिक विकासाचा समतोल साधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
अभियानाच्या वेळापत्रकानुसार, १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत स्थानिक स्वराज्य संस्थांनी राबवलेल्या उपक्रमांचे मूल्यांकन केले जाणार आहे.
१ एप्रिल ते १५ एप्रिल २०२६ दरम्यान माहिती संकलित करून ती ऑनलाइन पोर्टलवर सादर करणे बंधनकारक आहे. यानंतर एप्रिल महिन्यात डेस्कटॉप असेसमेंट आणि मे महिन्यात प्रत्यक्ष क्षेत्रीय पाहणी केली जाईल.
अभियानाचा निकाल आणि बक्षीस वितरण ५ जून २०२६ रोजी जागतिक पर्यावरण दिनाच्या मुहूर्तावर पार पडणार आहे.
ग्रामीण भागासाठी या अभियानाचे स्वरूप व्यापक असून, २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्येच्या आधारावर सात विविध गटांमध्ये ग्रामपंचायतींची विभागणी करण्यात आली आहे. यामध्ये १० हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावांपासून ते १ हजारांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या २७,९०० ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांनी यापूर्वी नोंदणी केलेली नाही, त्यांना अधिकृत पोर्टलवर नवीन नोंदणी करावी लागणार आहे. सादर केलेली माहिती चुकीची आढळल्यास संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेला स्पर्धेतून बाद करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रशासकीय प्रमुखांवर माहितीच्या अचूकतेची जबाबदारी सोपवण्यात आली असून, तृतीय पक्षाद्वारे या कामाचे काटेकोर मूल्यमापन केले जाणार आहे.

Leave a Reply