
रत्नागिरी: कोकणातील काजू उत्पादनात यंदा मोठी घट झाल्याने रत्नागिरीसह संपूर्ण पट्टयातील बागायतदार आर्थिक संकटात सापडले आहेत. दापोली, खेड, गुहागर आणि राजापूर भागात निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादनात ५० टक्क्यांहून अधिक घट झाली आहे.
बाजारात काजूला १६० ते १७० रुपये प्रति किलो असा चांगला दर मिळत आहे. मात्र, शेतकऱ्यांकडे विक्रीसाठी पुरेसा मालच उपलब्ध नाही. त्यामुळे वाढीव दराचा फायदा घेता येत नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे.
हवामानातील बदलामुळे बागांमध्ये कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. पावसाचा लांबलेला कालावधी, मोहराच्या वेळी आलेले दाट धुके आणि सतत बदलणारे तापमान यामुळे मोठ्या प्रमाणावर फुलगळ झाली. बागायतदारांनी खत, औषधे आणि मजुरीवर मोठा खर्च केला असला, तरी उत्पादन घटल्याने हा खर्च निघणेही कठीण झाले आहे.
उत्पादन कमी असल्याने बाजारात मालाचा तुटवडा जाणवत असून व्यापाऱ्यांच्या व्यवहारांवरही मर्यादा आल्या आहेत. या गंभीर परिस्थितीमुळे शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी केली जात आहे.

Leave a Reply