रत्नागिरी: स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने चिपळूण शहरात अंमली पदार्थविरोधी मोहिमेत मोठे यश मिळवले आहे. 25 एप्रिल 2025 रोजी खेर्डी M.I.D.C. मार्गावर गस्त घालत असताना पोलिसांना एका स्विफ्ट वाहनात (क्र. MH08-AG-0337) संशयास्पद हालचाली आढळल्या. पथकाने दोन पंचांच्या उपस्थितीत तपासणी केली असता, वाहनातून 9 ग्रॅम मेफेड्रोन सदृश अंमली पदार्थ जप्त करण्यात आला. याप्रकरणी दीपक रंगलाल लीलारे (वय 24, रा. कावीळ तळी, चिपळूण) याला अटक करण्यात आली आहे. 

जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी आणि अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई झाली. जप्त केलेला माल, ज्यामध्ये मेफेड्रोन आणि वाहनाचा समावेश आहे, याची एकूण किंमत 5,20,000 रुपये आहे. या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 

कारवाईत सहभागी पथकात स.पो.नि. विलास जाधव, पो.उप.नि. हर्षद हिंगे, पो.हवा. बाळू पालकर, विक्रम पाटील, प्रवीण खांबे, गणेश सावंत, वृक्षाल शेटकर, पो.शी. नीलेश शेलार आणि चा.पो.शी. अतुल कांबळे यांचा समावेश होता. 

रत्नागिरी पोलिसांचे अंमली पदार्थांच्या विरोधातील हे पाऊल जिल्ह्यातील ड्रग्जविरोधी मोहिमेला बळ देणारे ठरले आहे.