दापोली : बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी दापोली दौऱ्यादरम्यान अडखळ आणि हर्णे जेटीच्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी ठेकेदार आणि बंदर विकास खात्याच्या अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले.

“मला खोटी माहिती देऊ नका, खोटी माहिती दिल्यास दुप्पट दंड ठोकेन,” असा सज्जड दम ठेकेदाराला देताना त्यांनी अडखळ जेटीवरील गाड्यांच्या अवैध पार्किंगमुळे झालेल्या वादावरही तीव्र नाराजी व्यक्त केली.

“ही बंदर विकास खात्याची जागा आहे, येथे गाड्यांना पार्किंगची परवानगी कोण देतं?” असा सवाल करत अधिकाऱ्यांची हजेरी घेतली. “लक्ष दिलं नाही, तर तुम्हाला घरी पाठवावं लागेल,” असा इशारा देत त्यांनी गाड्या समुद्रात लोटण्याची धमकीही दिली.
यावेळी घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांनाही त्यांनी शांत राहण्यास सांगितले. “मी इथे हवा भरायला आलो नाही, माझ्या खात्याच्या अधिकाऱ्यांशी बोलतोय, थांबा,” असं सुनावलं.

राणे यांच्या दौऱ्याचं मुख्य कारण पाजपंढरी येथील श्रीराम मंदिरात होणारी हिंदू धर्मसभा होती. याचवेळी त्यांनी अडखळ आणि हर्णे बंदर जेटीच्या कामाची पाहणी केली.
अडखळ जेटीवर अवैध गाड्या पार्किंगमुळे दोन गटांमध्ये मारामारी झाली होती. याला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा राणे यांनी दिला.

एका कार्यकर्त्याने शेजारील अवैध मुतारीच्या कामाची माहिती दिली. यावर राणे यांनी तातडीने अधिकाऱ्यांकडे चौकशी करत, “ही जागा खात्याच्या हद्दीत आहे का?” असा प्रश्न केला.
अधिकाऱ्यांकडून स्पष्ट उत्तर न मिळाल्याने, “माझ्या खात्याच्या हद्दीत काही अवैध असेल, तर मला सांगा, चुकीची माहिती देऊ नका,” अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली.

हर्णे बंदर जेटीच्या कामाला मार्चमध्ये पर्यावरण खात्याची मंजुरी मिळाली असून, 205.26 कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे. यासंदर्भात नितेश राणे म्हणाले,
“रत्नागिरी जिल्ह्यातल्या अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या हर्णे बंदर जेटीच्या कामाची आज पाहणी केली व अधिकाऱ्यांना हे काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. स्थानिक मच्छीमारांना रोजगार मिळावा व स्थानिकांना विश्वासात घेऊन त्यांचा फायदा व्हावा या दृष्टीने या खात्याचा मंत्री म्हणून स्थानिकांशी संवाद साधला व जेटीचे काम दर्जेदार होण्यासंबंधी अधिकाऱ्यांना सूचना केल्या.”

“हे काम वेळेत, दर्जेदार होऊन स्थानिक मच्छीमारांना रोजगार मिळावा, यासाठी मी स्वतः पाहणी करत आहे,” असंही राणे यांनी सांगितलं. त्यांनी अधिकाऱ्यांना कामाची गुणवत्ता आणि वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.
