रत्नागिरी : दापोली तालुक्यातील बुरोंडी समुद्रात एलईडी लाईटचा वापर करून अनधिकृत मासेमारी करणाऱ्या बोटीवर मत्स्यव्यवसाय विभागाने गुरुवारी मध्यरात्री कारवाई केली.

या कारवाईत बोट जप्त करण्यात आली असून, त्यावर दोन तांडेल आणि दोन खलाशी आढळले.

राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या निर्देशानुसार, मत्स्यव्यवसाय विभागाकडून अनधिकृत मासेमारी आणि एलईडी लाईटच्या वापरावर सातत्याने कारवाई सुरू आहे.

त्याचाच भाग म्हणून, 25 एप्रिल 2025 रोजी रात्री 00:45 वाजता बुरोंडी समोर 11.5 सागरी मैलांवर मत्स्यव्यवसाय विभागाच्या गस्ती दरम्यान ही कारवाई करण्यात आली.

अंमलबजावणी अधिकारी दीप्ती साळवी आणि सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी (परवाना अधिकारी, दाभोळ) यांनी गस्त घालताना नझीम अली जांभारकर (रा. पडवे, ता. गुहागर, जि. रत्नागिरी) यांची ‘साबीर’ (नों. क्र. IND-MH-4-MM-493) ही बोट अनधिकृतपणे एलईडी लाईटचा वापर करताना आढळली.

महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम 1981 आणि सुधारणा अधिनियम 2021 अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. बोट जप्त करून दाभोळ बंदरात आणण्यात आली असून, त्यावर मासळी आढळली नाही. बोटीवरील एलईडी लाईट आणि संबंधित उपकरणेही जप्त करण्यात आली आहेत.

ही कारवाई सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, रत्नागिरी सागर कुवेस्कर आणि मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी, रत्नागिरी आनंद पालव यांच्या मार्गदर्शनाखाली झाली.

अंमलबजावणी अधिकारी दीप्ती साळवी, सागरी सुरक्षा पर्यवेक्षक, सागरी सुरक्षा रक्षक आणि गस्ती नौका रामभद्रा येथील कर्मचाऱ्यांनी यात सहकार्य केले.