चिपळूण – मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडले आहे. आता पावसाळा अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपला असताना, या कामाला गती देण्यासह अन्य प्रलंबित कामे लवकर पूर्ण करण्याच्या सूचना आमदार निलेश राणे यांनी राष्ट्रीय महामार्ग उपविभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
शनिवारी चिपळूण दौऱ्यावर आले असताना आ. निलेश राणे यांनी महामार्गाच्या कामाची पाहणी करून अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण व्हावे, यासाठी निलेश राणे यांनी खासदार असताना केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.
त्याचबरोबर जनतेसह पत्रकारांनीही या मुद्द्यावर सतत आवाज उठवला होता. या सर्वांच्या प्रयत्नांना यश आले आणि काही वर्षांपूर्वी या महामार्गाच्या चौपदरीकरणाला सुरुवात झाली.
गेल्या वर्षी रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार म्हणून निवडून आलेले माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही या कामाकडे विशेष लक्ष दिले आहे. मात्र, तरीही हे काम अजूनही पूर्णत्वास गेलेले नाही.
दरम्यान, बहादूरशेखनाका येथील पुलाचा काही भाग कोसळणे, परशुराम घाटात संरक्षक भिंत कोसळणे, पावसाळ्यात दरडी कोसळणे, चिपळूणात ओव्हर ब्रिजच्या कामादरम्यान कामगार खाली पडून जखमी होणे आणि परशुराम घाटात रस्ता खचणे अशा अनेक घटनांनी या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. या सर्व समस्यांवर माजी नगरसेवक परिमल भोसले यांनी आ. निलेश राणे यांचे लक्ष वेधले होते.
शनिवारी चिपळूणमध्ये आले असताना आ. निलेश राणे यांनी राष्ट्रीय महामार्ग उपविभागाच्या अधिकाऱ्यांशी बैठक घेतली.
यावेळी त्यांनी चिपळूण शहरातून जाणाऱ्या ओव्हर ब्रिजच्या धीम्या गतीने सुरू असलेल्या कामाबाबत ठेकेदाराला समज देऊन ते लवकर पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
तसेच परशुराम घाटात सातत्याने घडणाऱ्या अपघातांवर उपाययोजना करण्याचे आणि चिपळूण शहरातील पॉवर हाऊस परिसरात वारंवार होणाऱ्या अपघातांना आळा घालण्यासाठी योग्य पावले उचलण्याचे सांगितले.
या चर्चेत राष्ट्रीय महामार्ग उपविभागाचे अधिकारी नजीम मुल्ला आणि खुणेकर यांनी डिसेंबर २०२५ पूर्वी बहुतांश कामे पूर्ण करण्याची ग्वाही दिली.
यावेळी माजी नगरसेवक परिमल भोसले, विजय चितळे, आशिष खातू, भाजपा शहर उपाध्यक्ष महेश कांबळी, प्रफुल्ल पिसे, शुभम पिसे, सुधीर पानकर, अभिषेक जागुष्टे, हरिश्चंद्र रहाटे, शौर्य निमकर आदी उपस्थित होते.