रत्नागिरी: जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी 22 मार्च 2025 रोजी 00.01 वाजल्यापासून ते 5 एप्रिल 2025 रोजी 24 वाजेपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) प्रमाणे प्रतिबंधात्मक मनाई आदेश अपर जिल्हादंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी जारी केले आहेत.
जिल्ह्यात विविध राजकीय पक्ष, संघटना आणि नागरिकांकडून त्यांच्या मागण्यांसाठी आंदोलने केली जातात. तसेच, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 चे काम रखडल्यामुळे आंदोलने होण्याची शक्यता आहे.
रमजान महिना सुरू असून गुढीपाडवा आणि रमजान ईद हे सण येत आहेत. यामुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे आवश्यक असल्याने हे आदेश जारी करण्यात आले आहेत.
या आदेशानुसार, हत्यारे, स्फोटके, शस्त्रे बाळगणे, चिथावणीखोर भाषणे करणे, पाचपेक्षा जास्त लोकांनी एकत्र येणे यांसारख्या कृत्यांवर बंदी घालण्यात आली आहे.
अंत्ययात्रा, धार्मिक विधी, शासकीय कार्यक्रम आणि सार्वजनिक मनोरंजनाच्या ठिकाणी हे आदेश लागू होणार नाहीत.
मोर्चे, मिरवणुका किंवा सभा आयोजित करायची असल्यास उपविभागीय दंडाधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक आहे.