नवी दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतर-मंतर येथे आयोजित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठी घडामोड समोर आली असून प्रसिद्ध युट्युबर ध्रुव राठी याला गुडगावमध्ये ताब्यात घेण्यात आले आहे.

कॉकरोच जनता पार्टी अर्थात CJP च्या नियोजित आंदोलनापूर्वी पोलिसांनी ही कारवाई केल्याचे प्राथमिक वृत्तात नमूद करण्यात आले आहे. दिल्ली पोलिसांनी गुडगाव पोलिसांच्या मदतीने शनिवारी सकाळी पावणे आठच्या सुमारास गुडगावमधील सेक्टर ५६ येथील निवासस्थानावरून ध्रुव राठी याला ताब्यात घेतले.

या कारवाईमागील अधिकृत कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, त्याच्यावर कोणती कायदेशीर कारवाई केली गेली आहे का, याबाबत अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.

दरम्यान, मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी CJP ने शनिवारी जंतर-मंतर येथे निषेध आंदोलन पुकारले आहे.

या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक करण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाचे सुमारे २३ हजार जवान आणि दिल्ली पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

संवेदनशील भागांमध्ये देखरेखीसाठी ड्रोनचा वापर केला जात असून, मध्य दिल्लीतील सुमारे चार किलोमीटरच्या परिसरात २४ तासांसाठी मोबाईल इंटरनेट सेवा खंडित करण्यात आली आहे.

आंदोलनासाठी जंतर-मंतर येथे जमलेल्या सुमारे १५० तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, दिल्लीभरातून किमान ६०० जणांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे.

सुरक्षेच्या कारणास्तव काही मार्गांवरील वाहतूक वळवण्यात आली असून नवी दिल्ली आणि हजरत निजामुद्दीन स्थानकांवर येणाऱ्या किंवा तेथून सुटणाऱ्या सुमारे २५० रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

दुसरीकडे, CJP चे संस्थापक अभिजित दिपके, प्रवक्ते आशुतोष रांका आणि सह-संयोजक सौरव दास हे या आंदोलनात सहभागी होण्यासाठी मुंबईहून दिल्लीला रवाना झाले असून दिपके यांचे विमान दिल्ली विमानतळावर दाखल झाले आहे.

एका बाजूला जंतर-मंतर परिसरात आंदोलकांची उपस्थिती वाढत असताना, दुसऱ्या बाजूला ध्रुव राठी याला ताब्यात घेतल्याने दिल्लीतील राजकीय आणि सामाजिक वातावरण तापले आहे.