रत्नागिरी : कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने देण्यात येणारे सन २०२४-२५ या वर्षाचे वाड्मयीन व वाड्मयेतर पुरस्कार वाङ्मयीन पुरस्कार समितीच्या अध्यक्ष नमिता कीर आणि डॉ. प्रदीप ढवळ यांच्याकडून नुकतेच घोषित करण्यात आले आहेत.
मागील अनेक वर्षे मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीच्या वृद्धीसाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या या परिषदेने विहित कालावधीतील प्राप्त प्रस्तावांची जाणकार परीक्षकांकडून छाननी करून या पुरस्कारांची घोषणा केली आहे.
यावर्षीचा राज्यस्तरीय कविता राजधानी पुरस्कार प्रसिद्ध कवी व गीतकार प्रविण दवणे यांना जाहीर झाला आहे.
कादंबरी विभागात विवेक गोविलकर यांच्या ‘सिंफनी’ या कादंबरीला र. वा. दिघे स्मृती प्रथम पुरस्कार, तर उदय जोशी यांच्या ‘संघर्षपर्व’ कादंबरीला वि. वा. हडप स्मृती द्वितीय पुरस्कार मिळाला आहे.
कथा विभागात स्टिफन परेरा यांच्या ‘काळवेळ’ या कथासंग्रहाला वि. सी. गुर्जर स्मृती प्रथम, तर अशोक लोटणकर यांच्या ‘निराधार’ कथासंग्रहाला विद्याधर भागवत स्मृती द्वितीय पुरस्कार जाहीर झाला आहे.
कविता विभागात दिलीप पांढरपट्टे यांच्या ‘उडवाच मान माझी’ या कवितासंग्रहाला आरती प्रभू स्मृती प्रथम आणि विलास गावडे यांच्या ‘व्यक्त होतोय मी’ या कवितासंग्रहाला वसंत सावंत स्मृती द्वितीय पुरस्कार मिळाला आहे.
आत्मचरित्र विभागात आनंद इंदिरा श्रीधर सांडू यांच्या ‘क्षण सोनेरी – रुपेरी आणि काटेरी’ या संग्रहास धनंजय कीर स्मृती प्रथम पुरस्कार, तर चरित्र विभागात शामसुंदर गावकर यांच्या ‘भरती – ओहोटी’ या चरित्रास श्रीकांत शेट्ये स्मृती पुरस्कार मिळाला आहे.
समीक्षा विभागात शिल्पा जोशी यांच्या ‘मंगेश पाडगावकरांचे गीत – काव्य’ या ग्रंथास प्रभाकर पाध्ये स्मृती पुरस्कार आणि नाटक विभागात अरुण तुकाराम मोर्ये यांच्या ‘कृष्णा माझं काय चुकलं’ या नाटकास भाई भगत पुरस्कार जाहीर झाला आहे.
ललित गद्य विभागात वर्षा कुवळेकर यांच्या ‘सफर खूबसुरत है मंजिलसे’ या ग्रंथास अनंत काणेकर स्मृती प्रथम आणि नितीन तेंडुलकर यांच्या ‘अधिक उंच उडता उडता’ या साहित्यकृतीस लक्ष्मीबाई व राजाभाऊ गवांदे स्मृती द्वितीय पुरस्कार जाहीर झाला आहे.
बालवाङ्मय विभागात लक्ष्मण शिवणेकर यांच्या ‘शशा रे सशा’ या ग्रंथास प्र. श्री. नेरुरकर स्मृती पुरस्कार, संकीर्ण विभागात विजयालक्ष्मी देवगोजी यांच्या ‘कातळशिल्पांच्या पाऊलखुणा’ या ग्रंथास वि. कृ. नेरुरकर स्मृती प्रथम आणि रविराज गंधे यांच्या ‘महासागर’ या ग्रंथास अरुण आठल्ये स्मृती द्वितीय पुरस्कार मिळाला आहे.
वैचारिक विभागात रेखा कोरे यांच्या ‘महात्मा बसवेश्वर – कृतीतून प्रगतीकडे’ या ग्रंथास फादर स्टीफन सुवार्ता पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच कादंबरी, कथासंग्रह आणि संकीर्ण विभागातील विशेष पुरस्कार अनुक्रमे प्रकाश पाटील यांच्या ‘डंकी रूट’, मेघना साने यांच्या ‘ऍडजस्टमेंट’ आणि जिवबा केळुसकर यांच्या ‘तिमिरातून तेजाकडे’ या पुस्तकांना, तर संपादन विभागाचे विशेष पुरस्कार उज्ज्वला चंद्रशेखर धानजी यांच्या ‘वलयांकित चंद्र’ आणि प्रज्ञा जांभेकर यांच्या ‘आठवचित्रे’ या पुस्तकांना जाहीर झाले आहेत.
वाड्मयेतर पुरस्कारांमध्ये साहित्य, पर्यावरण व शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अशोक नर यांना भाऊसाहेब वर्तक प्रतिष्ठान पुरस्कार, तर सुनिल मुरारी तथा बंधू मयेकर यांना बा. कारखानीस पुरस्कार जाहीर झाला आहे.
कोमसाप कार्यकर्ता पुरस्कार मंगेश आत्माराम मस्के आणि तुकाराम विठ्ठल तथा बाळ कांदळकर यांना, तर वाड्मयीन कार्यकर्ती पुरस्कार पुष्पा कोल्हे व शुभदा मुळ्ये यांना मिळाला आहे.
उत्कृष्ट कोमसाप शाखा म्हणून मुंबई जिल्ह्यातील चेंबूर आणि रायगड जिल्ह्यातील मुरुड जंजिरा शाखांना वामनराव दाते स्मृती पुरस्कार जाहीर झाला आहे.
ग्रामीण भागातील स्त्री लेखिकेसाठीचा नमिता कीर लक्षवेधी पुरस्कार संध्या दिवकर व स्नेहा फणसळकर यांना, सुलोचना मुरारी नार्वेकर स्मृती पुरस्कार संस्कृती महेंद्र तांडेल हिला, उमाकांत कीर स्मृती काव्य पुरस्कार अमेय धोपटकर याला आणि कोमसाप युवा कार्यकर्ता पुरस्कार प्रविण सोनावणे याला जाहीर झाला आहे.
या सर्व विजेत्यांना लवकरच एका विशेष समारंभात मान्यवरांच्या उपस्थितीत रोख रक्कम, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
मधु मंगेश कर्णिक, नमिता कीर, प्रदीप ढवळ आणि प्रकाश दळवी यांच्यासह संपूर्ण कोकण मराठी साहित्य परिषद परिवाराने या सर्व पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले आहे.

