रत्नागिरी : रत्नागिरी डिस्ट्रिक्ट केमिस्ट अँड डिस्ट्रीब्युटर्स असोसिएशनच्या त्रैवार्षिक निवडणुकीत मोठा राजकीय उलटफेर पाहायला मिळाला असून, केमिस्ट सभासदांनी उस्फूर्तपणे मतदान करत निर्भय पॅनेलच्या हाती संघटनेची सर्व सूत्रे सोपवली आहेत.

रविवारी चार ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या या चुरशीच्या निवडणुकीत जिल्ह्यातून तब्बल अठ्ठ्याऐंशी टक्के विक्रमी मतदान झाले.

या निवडणुकीत खजिनदारांचे एकता पॅनेल आणि सर्वसाधारण केमिस्टचे निर्भय पॅनेल यांच्यात थेट आणि अटीतटीची लढत झाली होती.

मात्र, निर्भय पॅनेलने प्रतिस्पर्धी एकता पॅनेलचा पूर्ण धुव्वा उडवत सर्वच्या सर्व जागांवर ऐतिहासिक विजय संपादन केला असून त्यांचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत.

संघटनेत जिल्हाभरातून केमिस्ट व्यावसायिकांनी या मतदानात उस्फूर्त प्रतिसाद दाखवला.

निर्भय पॅनेलच्या या दणदणीत विजयामुळे रत्नागिरी जिल्हा केमिस्ट असोसिएशनमध्ये आता नव्या पर्वाला सुरुवात झाली असल्याचे सांगण्यात आले.

विजयी उमेदवारांमध्ये अध्यक्षपदी राजेश घोसाळकर, सचिवपदी सचिन कोतवडेकर, खजिनदारपदी प्रफुल्ल लांजेकर, कार्याध्यक्षपदी संदीप गुजर, उपाध्यक्षपदी अभिजीत आवळे आणि सहसचिवपदी रुपेश शेलार यांची निवड झाली आहे.

तसेच कार्यकारिणी सदस्यांमध्ये आरिफ मेमन, निहार गुडेकर आणि मुबीन मालगुंडकर यांचा समावेश आहे. दरम्यान, अन्य एका घडामोडीत शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या तरुणांचे योगेश कदम यांनी स्वागत केले.