रत्नागिरी :  ०१ जुलै 2024 पासून संपुर्ण भारतात भारतीय न्याय संहिता 2023, भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 आणि भारतीय साक्ष अधिनियम हे नवीन कायदे लागू करण्यात आलेले आहेत.

नवीन कायद्याचा उद्देश यासह नवीन कायदयातील बदल, कायदयाबाबत शंकेचे निरसन करणे, कायदयाविषयी जनजागृती, प्रसिध्दी व प्रसार करण्याकरीता आज दिनांक एक जुलै रोजी सकाळी १०.०० ते १३.५० या वेळेत रत्नागिरीतील अल्पबचत हॉल येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश निखिल गोसावी, कीर विधी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य आशिष बर्वे, जिल्हा सरकारी अभियोक्ता अनिरुध्द फणसेकर, जिल्हा पोलीस  अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी मार्गदर्शन करुन चर्चासत्र घेतले.

या कार्यशाळेकरता रत्नागिरी जिल्ह्यातील विशेष करुन रत्नागिरी शहर व ग्रामीण हद्दीतील नागरीक, पोलीस पाटील, महिला दक्षता सदस्य व पत्रकार असे बहुसंख्येने उपस्थित होते.

रत्नागिरी शहरामध्ये शिवाजीनगर, सावरकर नाटयगृह तसेच माळनाका याठिकाणी जनतेमध्ये प्रबोधन, जनजागृती करण्यात आलेली असून जनतेला नवीन कायदयामध्ये झालेल्या बदलांबाबत माहिती देण्यात आलेली आहे.

जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांचे हद्दीत रॅलीचे आयोजन करुन नवीन कायदयाची जनजागृती करण्यात आलेली आहे. नवीन कायदयातील बदल व माहितीची पत्रके वाटून लोकांना माहिती देवून जनजागृती करण्यात आलेली आहे.