दापोली : गेल्या अनेक वर्षांपासून नगरपंचायत आवारातील बंद पडलेल्या पवनचक्कीचा टॉवर एका कारवर कोसळण्याची घटना आज दुपारी घडली. टॉवर पडल्यावर मोठा आवाज आल्याचं आसपासच्या परिसरामध्ये घबराट पसरली.

या घटनेमुळे टॉवर खाली पार्किंग केलेल्या शिवसेना (उबाठा) पक्षाचे तालुकाप्रमुख ऋषिकेश गुजर यांच्या चारचाकी गाडीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही घटना आज दुपारी घडली आहे.

दापोली नगरपंचायतीच्या हद्दीत असे चार टॉवर्स चारही कोपऱ्यांवर उभे आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून हे टॉवर्स बंद अवस्थेत आहेत. या टॉवर्समुळे काही काळ वाद सुद्धा झाला होता.

पवनचक्कीचा पडलेला भाग आणि गाडी

आता हे टॉवर्स जुने झाले आहेत. त्यामुळे टॉवर्स कोसळण्याची भीती व्यक्त होत होती. यापूर्वी देखील टॉवर्स उतरवण्यासंदर्भात अनेकांनी नगरपंचायतीच्या संबंधित अधिकाऱ्यांना, पदाधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे.

तरीही याकडे दुर्लक्ष झालं आहे. आज या चारपैकी एका पवनचक्कीच्या टॉवरचा काही भाग कोसळला आहे. बाकीच्या टॉवर्सला हा धोका अद्याप आहेच.

नगरपंचायतीच्या आवारातील चारही टॉवर्स तातडीने उतरवण्यात यावेत अशी मागणी जनतेमधून होत आहे. टॉवर्समुळे जर एखाद्याचं काही बरं वाईट झालं तर त्याला जबाबदार कोण? असा सवाल देखील आता नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.