दापोली : शहरातील बालरोग उपचार सेवांना अधिक बळ देणाऱ्या ‘वर्षा चिल्ड्रन्स क्लिनिक’ या नव्या दवाखान्याचे उद्घाटन गुरुवारी सकाळी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.

वीर सावरकर मार्ग, पोस्ट लेन येथील अर्बन बँकेसमोर सुरू करण्यात आलेल्या या क्लिनिकमुळे दापोली व परिसरातील बालकांना आधुनिक आणि दर्जेदार वैद्यकीय सेवा उपलब्ध होणार आहेत.

या उद्घाटनप्रसंगी दापोली अर्बन बँकेचे अध्यक्ष जयवंत जालगावकर, माजी समाज कल्याण सभापती भगवान घाडगे, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सुधीर कालेकर, दापोली नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष कृपा घाग, प्रदीप सुर्वे, राकेश कोटिया, वैशाली कालेकर, दापोली अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी थोरात, अधिकारी प्रसाद लागू यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, नागरिक आणि रुग्णांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून दिलीप जोशी आणि अनिल काकडे यांनी सहभाग घेत ग्रामीण भागातील बालरोग सेवांचे महत्त्व अधोरेखित केले.

बालकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची उपलब्धता ही काळाची गरज असून या क्लिनिकमुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

बालरोगतज्ज्ञ अक्षय सालुंखे यांनी मुंबईतील सायन हॉस्पिटलमधून एमबीबीएस आणि केईएम तसेच वाडिया हॉस्पिटलमधून बालरोग विषयातील एम.डी. पदवी प्राप्त केली आहे. त्यांच्या या उच्च वैद्यकीय शिक्षणाचा आणि अनुभवाचा लाभ आता दापोलीतील नागरिकांना मिळणार आहे.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अक्षय सालुंखे आणि एस. के. मेडिकलचे प्रसाद सुधीर कालेकर यांनी विशेष परिश्रम घेतले. परिसरातील बालकांसाठी आधुनिक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सुरू झालेल्या या क्लिनिकमुळे आरोग्य क्षेत्रात महत्त्वाची भर पडल्याची भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.