रत्नागिरी – निसर्ग चक्रीवादळाने मंडणगड आणि दापोलीतील जनजीवन सुरळीत होईपर्यंत सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी म्हणून काम करावे व येथेच राहून जनजीवन सुरळीत होण्यासाठी प्रयत्न करावेत असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज केले.
दापोली येथील बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या विश्वेश्वरय्या सभागृहात एका बैठकीत त्यांनी सर्व संबंधित विभागांचा आढावा घेऊन आगामी काळात करावयाच्या कामाबाबत मार्गदर्शन केले.
जनजीवन सुरळीत होण्याच्या दृष्टिकोनातून स्वतः मंत्री महोदय हे दापोली येथे मुक्कामी आहेत. विद्युत पुरवठा पंचनामे व इतर अनुषंगिक बाबीचा त्यांनी संबंधित विभागांकडून आज या बैठकीत आढावा घेतला.
निसर्ग चक्रीवादळाच्या अनुषंगाने उदय सामंत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांनी माजी मंत्री रामदास कदम, खासदार विनायक राऊत यांच्यासमवेत महसूल, एमएसिबी, पाणीपुरवठा, आरोग्य विभाग, गावांमधील कनेक्टिव्हिटी आदी विषयांसंदर्भात विश्वेश्वराय सभाग्रह कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथे आढावा बैठक घेतली.
यावेळी आमदार योगेश कदम जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे आदि तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी उदय सामंत म्हणाले प्रत्येक विभागाच्या अधिकाऱ्याने ही आपली जबाबदारी आहे असे समजून काम करणे आवश्यक आहे. निसर्ग चक्रीवादळामुळे बाधित क्षेत्रांमध्ये काही ठिकाणी बँका बंद आहेत, त्यामुळे अशा ठिकाणी नागरिकांना बँकेतून पैसे काढणे शक्य नाही अशा ठिकाणी पैसे त्यांच्यापर्यंत पोहोचावेत यासाठी आवश्यक ती यंत्रणा तयार करा. तसेच या सर्व गोष्टींवर देखरेख ठेवण्यासाठी जबाबदार अधिकारी नेमा, अशा सूचना यावेळी केल्या.
शासनाकडून देण्यात आलेल्या निकषानुसार नुकसान भरपाईची कार्यवाही करा. अजूनही काही क्षेत्रात अद्यापही वीज आलेली नाही, त्यामुळे एमएसिबी च्या अधिकाऱ्याने येथेच राहून 4 ते 5 दिवसात सर्व भागात वीज येईल याबाबतची कार्यवाही करावी.
संबंधित अधिकाऱ्यांनी दिवसभरात याबाबत केलेल्या कार्यवाहीचा आढावा आमदार योगेश कदम यांना दररोज द्यावा. तसेच कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी झाडनिहाय पंचनामे करत असताना झाडाचे आयुष्य व त्यापासून मिळणारे उत्पन्न याचाही पंचनाम्यामध्ये समावेश करावा, अशा सूचना माजी मंत्री रामदास कदम यांनी यावेळी दिल्या.