रत्नागिरी : राज्याच्या किनारपट्टी व्यवस्थापन आणि पर्यावरणपूरक पर्यटनाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठे यश मिळाले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील लाडघर आणि गुहागर या दोन सुंदर समुद्रकिनाऱ्यांसह रायगडच्या श्रीवर्धन किनाऱ्याला २०२६-२७ या हंगामासाठी प्रतिष्ठेचा आंतरराष्ट्रीय ‘ब्ल्यू फ्लॅग’ पुरस्कार जाहीर झाला आहे.
आंतरराष्ट्रीय ब्ल्यू फ्लॅग ज्युरीने ही घोषणा केली असून, या यशामुळे महाराष्ट्राने आंतरराष्ट्रीय ब्ल्यू फ्लॅग किनाऱ्यांच्या यादीत पहिल्यांदाच मानाचे स्थान मिळवले आहे.
विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यासाठी लाडघर आणि गुहागर किनाऱ्यांना मिळालेला हा बहुमान जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला जागतिक पातळीवर नवी ओळख देणारा ठरणार आहे.
समुद्रकिनाऱ्यांची स्वच्छता, पाण्याची गुणवत्ता, जैवविविधतेचे संरक्षण, पर्यटकांची सुरक्षितता, आवश्यक पायाभूत सुविधा आणि शाश्वत पर्यटन व्यवस्थापन या कठोर आंतरराष्ट्रीय निकषांची पूर्तता केल्याने लाडघर आणि गुहागर किनाऱ्यांना हा सन्मान प्राप्त झाला आहे.
या महत्त्वपूर्ण यशामागे राज्याचा पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, पर्यटन विभाग, रत्नागिरीचे जिल्हाधिकारी आणि स्थानिक प्रशासन, ग्रामपंचायती, बीच मॅनेजमेंट कमिटी तसेच स्थानिक नागरिकांचे मोठे योगदान आहे.
नव्याने पुरस्कारप्राप्त या किनाऱ्यांचा ब्ल्यू फ्लॅग हंगाम १५ नोव्हेंबर २०२६ पासून सुरू होणार आहे. नेदरलँड्स येथून हे आंतरराष्ट्रीय ब्ल्यू फ्लॅग प्राप्त झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाच्या समन्वयाने ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे.
देशात यंदा एकूण २२ किनाऱ्यांना ही मान्यता मिळाली असून, त्यात ९ नवीन किनाऱ्यांचा समावेश आहे. या नव्या यादीत महाराष्ट्राने झेप घेणे ही राज्यासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे.
या यशाबद्दल राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी आनंद व्यक्त केला आहे. लाडघर, गुहागर आणि श्रीवर्धन किनाऱ्यांना मिळालेला हा पुरस्कार म्हणजे राज्याच्या पर्यावरण संवर्धन, स्वच्छता आणि शाश्वत पर्यटनाच्या प्रयत्नांना मिळालेली जागतिक पावती असल्याचे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरण संरक्षण आणि विकासाचा समतोल साधला जात असून, या पुरस्कारामुळे रत्नागिरीसह महाराष्ट्राच्या किनारपट्टीला जागतिक पर्यटन नकाशावर नवी ओळख मिळेल आणि स्थानिक रोजगार तसेच अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भविष्यात राज्यातील इतर पात्र किनाऱ्यांचाही याच आंतरराष्ट्रीय दर्जानुसार विकास करून महाराष्ट्राला शाश्वत पर्यटनाचे अग्रगण्य केंद्र बनवण्याचा मानसही त्यांनी स्पष्ट केला आहे.

Leave a Reply